कोकणाला रेड अलर्ट! पोलीस, आरोग्य विभाग सज्ज

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

केंद्र सरकारने कोकणाला ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर ‘एअर स्ट्राईक’ केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला आहे. सागरी मार्गाने दहशतवादी हल्ले होण्याची भीती असल्यामुळे कोकणासह रायगड जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. आरोग्य विभागदेखील कामाला लागली आहे. वेगवेगळ्या उपाययोजना संबंधित विभागामार्फत करण्यात आल्या असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

22 एप्रिलला पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात निष्पाप 26 पर्यटकांचा जीव गेला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करीत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिल्याने भारत-पाकिस्तानात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने कोकणातील रायगडसह, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. कोकणातील विशेष करून रायगड जिल्हा मुंबईच्या अगदी जवळ असून, रायगड जिल्ह्यातील उरण येथे अब्जावधी रुपयांचा जेएनपीटी प्रकल्प आहे. कोकणाला 720 किलो मीटरचा सागरी किनारा लाभला असून, त्यातील रायगडला 240 किलोमीटरचा सागरी किनारा आहे. मुंबई येथे 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटापूर्वी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील शेखाडी येथील खाडीकिनारी आरडीएक्सचा साठा सापडला होता. त्यानंतर 26/11 ला झालेला मुंबईतील दहशतवादी हल्ला सागरी मार्गानेच झाला होता. त्यामुळे सागरी मार्गाने दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


पाकिस्तानचे मनसुबे उधळवून लावण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. जे पोलीस अधिकारी, अंमलदार रजेवर गेले आहेत, त्यांना तात्काळ हजर होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. कोस्टल आणि लँडींग भागात शस्त्रधारी नाकाबंदी केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात रात्री बारा ते सकाळी पाच वाजेपर्यंत स्पेशल ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले.

मच्छिमारांसोबत संवाद साधून त्यांना सर्तक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सागर सुरक्षा दल, ग्राम सुरक्षा दल आणि पोलीस पाटील यांच्या बैठका घेऊन जनजागृती करण्याचे काम सुरु केले आहे. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आले आहे.

सायबर सेलची राहणार नजर
भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवण्याचा प्रकार काही मंडळींकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोशल मीडिया सेल अ‍ॅक्टीव करण्यात आला आहे. सायबर सेल प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष ठेवणार आहे. ही यंत्रणा 24 तास सुरु ठेवली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथारे यांनी दिली.
सागरी किनार्‍यांवर राहणार लक्ष
शासनाने कोकणाला रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड जिल्ह्यातील सागरी सुरक्षा मजबूत ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे. जे दीर्घ रजेवर गेले आहेत, त्यांना पुन्हा बोलावण्यात आले आहे. पोलीस दलाच्या चार बोटी असून, वनविभाग व पीएनपी तसेच मच्छिमारांच्या बोटींद्वारे सागरी किनार्‍यांवरील संशयित हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच शासनाकडून दोन ट्रॉलर बोटी मागविण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आरोग्य विभाग सतर्क
भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील जे आरोग्य अधिकारी, कर्मचारी रजेवर गेले आहेत. त्यांना पुन्हा कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात 108 व 102 नंबरच्या 47 हून अधिक रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. औषधांचा साठादेखील पुरेसा उपलब्ध असून, मुख्यालयाच्या ठिकाणीच राहण्याची सूचना दिल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी दिली. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणादेखील या पार्श्‍वभूमीवर कामाला लागली आहे. ऑक्सिजन, औषधांचा आढावा घेण्यात आला आहे. सर्व सुस्थितीत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांनी दिली.
27 ठिकाणी मॉकड्रील
भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर थळमधील आरसीएफ कंपनी, मांडवा येथील टाकादेवी मच्छिमार सोसायटी, रेवदंडा, नागोठणे बसस्थानक, पाली येथील बल्लाळेश्‍वर मंदिर, मुरूडमधील पुरकर नाका, माणगावमधील भिरा येथील टाटा पॉवर हाऊस, मांदाड येथील चेकपोस्ट, आंबेत येथील लँडिंग पॉईंट, म्हसळा येथील नवानगरमधील दिघी रोड नाका, श्रीवर्धनमधील र.ना. राऊत हायस्कूल, महाडमधील विन्हेरे येथील रेल्वे स्टेशन, दासगाव जेट्टी, बिरवाडीमधील एमआयडीसी, पोलादपूरमधील बसस्थाक, धरमतर पीएनपी जेट्टी, जेएसडब्ल्यू कंपनी, पेण प्रायव्हेट स्कूल, दादरमधील लँडिंग पॉईंट, एचपीसीएल कंपनी इमेजिका वॉटर पार्क, खोपोली, नेरळ, रेल्वे स्टेशन, भिवपुरी येथील टाटा पॉवर हाऊस, माथेरानमधील राम चौक बाजारपेठ, बोर्ली पंचतन बसस्थानक, कोलाडमधील चिंचवली हायस्कूल या ठिकाणी मॉकड्रील करण्यात आली आहे.
वाहनांची कसून चौकशी होणार
कोकणात येणार्‍या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यांतील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. या परिस्थितीत या जिल्ह्यांमध्ये 24 तास पोलिसांची गस्त राहणार आहे.
नापाक इरादे हाणून पाडले
पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी तुर्की बनावटीच्या ड्रोनचा वापर केल होता. तसेच पाकिस्तानकडून सीमेवरून 36 ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. पण भारतीय सैन्याने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर मोठ्या कॅलिबरच्या शस्त्रांनी गोळीबार केला. यावेळी पाकिस्तानकडून सुमारे 300 ते 400 ड्रोन वापरण्यात आले. भारतीय सशस्त्र दलांनी अनेक ड्रोन पाडले, अशी माहिती परराष्ट्र खात्याच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी ही पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानचा रडीचा डाव उघडा पाडला.
'ही' 24 विमानतळे राहणार बंद
नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, अमृतसर, लुधियाना, भुंटर, किशनगड, पटियाला, शिमला, कांगडा-गग्गल, भटिंडा, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर, हलवारा, पठाणकोट, जम्मू, लेह, मुंद्रा, जामनगर, हिरासर (राजकोट), पोरबंदर, केशोड, कांडला आणि भुज ही विमानतळे पुढील सूचना मिळेपर्यंत नागरी प्रवासासाठी बंद राहणार आहेत.
Exit mobile version