| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. परंतु, आता ही सुनावणी पुढील तीन आठवडे लांबवणीवर पडली आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या वकिलांकडून खटल्यास विलंब होत आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तारीख द्यावी, अशी आग्रही मागणी केली. त्यावर तुम्ही आमच्या इथं येऊन बसा आणि तुम्हीच ठरवा. आमच्यावर खूप ताण असतो, तुम्हाला 1-2 दिवसात तारीख दिली जाईल, असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संतापून उत्तर दिलं.
शिवसेनेत फुटीनंतर आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. राहुल नार्वेकर यांनी शिवसेना, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील एकाही आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली नाही. एकनाथ शिंदेंसह त्यांच्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही, त्यामुळे ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांनी, तर अजित पवारांसह आमदारांना अपात्र न केल्यानं शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.