मुख्यमंत्र्यांचे भयभीत ग्रामस्थांकडे सपशेल दुर्लक्ष

तळियेकडे मुख्यमंत्री रवाना

महाड | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांचा महाड तालुक्यातील तळिये दरडग्रस्त गावाच्या पाहणीचा दौरा जाहिर झाला असताना महाड औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनीत रिएक्टर कंट्रोल होत नसल्याने स्थानिक लोक हजारोंच्या संख्येने स्थलांतरित होताना दिसत होते.
गेल्या दोन वर्षांपासून लक्ष्मी कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेमुळे परिसरातील जनजीवन कोणत्याही क्षणी धोक्यात येईल अशी परिस्थिती आहे. आसनपोई येथील लक्ष्मी कंपनीच्या युनिट 2मध्ये यापूर्वीही आग लागण्याची घटना घडली असून कालच एका टँकरने पेट घेतला होता.
दोन दिवस लक्ष्मी कंपनीच्या घडामोडींमुळे पर्यावरणावर तसेच परिसरातील उद्योग कारखानदारी सह लोकवस्तीवर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो.
आसनपोई भागात लक्ष्मी कंपनीच्या वायू गळतीमुळे आकाशात काळे ढग तयार झालेले दिसून येत असल्याने परिसरातील आसनपोई, बिरवाडी, वेरखोल, कुंभारवाडा अशा सुमारे पाच कि.मी. परिसरातील लोकांनी पायी चालत स्थलांतर केले. भयभीत ग्रामस्थांच्या चालण्याचा रस्ता आमशेत येथील फाईव्ह स्टार एमआयडीसीच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर थांबण्याच्या हेलिपॅडच्या दिशेने होता.
हेलिकॉप्टर मधून उतरल्यावर मुख्यमंत्र्यांच्या मोटारींचा ताफा दरडग्रस्त तळिये गावाकडे निघाला असता हे भयभीत ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने चालत असलेले पाहूनसुध्दा सर्वसामान्यांच्या या परिस्थितीकडे राज्यकर्त्यांनी सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
यापुर्वी, जाणता राजा शरद पवार यांनी ताफ्यातील स्वतःची गाडी थांबवायला लावून शेतकऱ्यांची आस्थापुर्वक चौकशी केल्याच्या घटना सर्वश्रृत असताना या मुख्यमंत्र्यांना बिरवाडी, आसनपोई, वेरखोले, कुंभारवाडा परिसरातील आबालवृद्धांची चौकशी करण्याची संधी मिळाली होती ती त्यांनी वाया दवडली. काहिंच्या मते मुख्यमंत्र्यांना रस्त्याच्या दुतर्फा गावकऱ्यांची गर्दी दिसावी म्हणून स्थानिक आमदारांनीच अशी अफवा कार्यकर्त्यांमार्फत उठवली होती.

Exit mobile version