आंबेत पुलाबाबत ‘संघर्ष’चे मुख्यमंत्र्यांना साकडे

| आंबेत | वार्ताहर |

माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. अंतुले यांच्या कारकीर्दीत उभारण्यात आलेला आंबेत सावित्री पूल हा गेली तीन वर्षे तांत्रिक अडचणींमुळे बंद आहे. मात्र, स्थानिकांसह इतर प्रवासीवर्गाला त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपले गार्‍हाणे मांडले. या पुलाबाबत लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

दरम्यान, आंबेत पुलाबाबत पाठपुरावा करण्यासाठी काही दिवसांपूर्वी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी एकत्र येत संघर्ष समितीची स्थापना केली आहे. जेणेकरून या समितीकडून प्रत्येक गोष्टीची दखल घेऊन या बाबतीत योग्य तो पाठपुरावा घेतला जाईल. याच पार्श्‍वभूमीवर सोमवार, दि 19 सप्टेंबर रोजी सावित्री नदी रायगड-रत्नागिरी संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांसह आ. भरत गोगावले उपस्थित होते. यावेळी समितीची बाजू पडताळून पाहता लवकरच यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याने आंबेतसह रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Exit mobile version