। माणगाव । सलीम शेख ।
माणगावमधील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या कार्यक्रमाला महायुती सरकारने बोलवले खरे, पण तब्बल पाच तास कार्यक्रम उशिराने सुरु झाल्याने रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची चांगलीच रखडपट्टी झाली. जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून पहाटे निघालेल्या बहिणींना मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आटोपून घर गाठण्यासाठी रात्र होईल, हे लक्षात येताच काही बहिणींनी कार्यक्रम सोडून जाणे पसंत केले. तर काहींनी सरकारच्या नियोजनाचा ग्राम्य भाषेत फडशा पडला. एकीकडे लाडक्या बहिणीची नाराजी आणि दुसरीकडे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कार्यक्रमामध्ये दुजाभाव दिल्याने त्यांनीदेखील नाराजीची री ओढलेली पाहावयास मिळाली.
माणगावमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याचा हा कार्यक्रम प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार सकाळी 11:30 वाजता होणार होता. त्यासाठी सकाळी 9:30 वाजल्यापासूनच एसटी बसमधून जिल्ह्यातील विविध गावांतील महिलांना कार्यक्रम ठिकाणी आणण्यात आले. हा कार्यक्रम माणगावपासून मोर्बा रोड मार्गावर जवळपास दीड किलोमीटर अंतरावर असणार्या दिघी-पुणे राज्य मार्गावरील मोर्बा गावाजवळील निळगूण फाटा येथील अल्ताफदादा धनसे यांच्या भव्य मैदानावर होता. पार्किंगची व्यवस्था ज्या-ज्या ठिकाणी करण्यात आली होती. ती ठिकाणे वाहनांनी भरल्याने अन्य वाहने जागा मिळेल त्या ठिकाणी उभी करण्यात आली. त्यामुळे अनेक महिलांना एक किलोमीटरचे अंतर पायपीट करून कार्यक्रम ठिकाणी धापा टाकत यावे लागले. या कार्यक्रमास सकाळी 9:30 वाजल्यापासून लाडक्या बहिणींना बोलावून त्यांना सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत त्यांची रखडपट्टी झाली.
मुख्यमंत्र्यांच्या दौर्यात या कार्यक्रमाची वेळ दुपारी तीन वाजताची होती. 2 वाजून 40 मिनिटांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यक्रम ठिकाणी आगमन झाले. प्रत्यक्ष कार्यक्रम 2 वाजून 45 मिनिटांनी सुरु झाला. त्यानंतर पुढे चार वाजता हा कार्यक्रम संपला. हेलिकॉप्टर व वाहनांमधून आलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सारे मंत्री, नेते मंडळी हे ऐशोआरामात आपल्या पुढील प्रवासाला निघाले. कार्यक्रम संपल्यावर पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना आपण कोणत्या बसमधून आलो होतो. याची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागले. त्यातच कार्यक्रम सुरु असताना पावसाचे आगमन झाले. कार्यक्रम संपल्यावर पाऊस पडत असल्याने महिलांची घरी जाण्यासाठी धावाधाव झाली.
या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी माणगाव बाजारपेठेत व मोर्बा रोड मार्गावर ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या कमानी, लावलेले बॅनर्स, होर्डिंग्स यावर राज्यसभेचे खा.धैर्यशील पाटील यांचा फोटो नसल्याने रायगड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी चक्क नाराजी दर्शवली. या कार्यक्रमास उपस्थित असलेले भाजप युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी पत्रकारांसमक्ष नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले आम्हाला वाटले आमचे लोक येतील, परंतु ते आले नाहीत. आम्हाला या कार्यक्रमांतून आयोजकांनी पूर्णपणे डावलले. तसेच माणगाव शहरात सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाची साधी माहिती दिली नाही व निमंत्रणही दिले नसल्याने नाराजी व्यक्त केली.