खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका
। मुंबई ।वृत्तसंस्था ।
मागच्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक असे प्रकल्प गुजरातला नेले जात असल्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. यादरम्यान आणखी एक पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याची चर्चा होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून हा प्रकल्प राज्याचा असून तो राज्याबाहेर जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, केसरकर इथं आहेत. मी सकाळी मंत्री उदय सामंत यांच्याशी बोललो आहे. हा आपल्या राज्याचा प्रकल्प आहे आणि तो राज्यातून बाहेर जाणार नाही याची खात्री बाळगा.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं की, एमटीएचएलचं 12 तारखेला प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे, एमटीएचएल हा देशातील 22 किलोमिटरचा सिंगल लाँगेस्ट सी ब्रीज आहे. यामुळे दोन तासांचं अंतर 15 ते 20 मिनीटांवर येणार आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
सिंधुदुर्गमधील प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना खोल समुद्राच्या पाण्यातील अंतरंग अनुभवता येणार आहे. मात्र हा प्रकल्प आता गुजरातला गेला असून तो गुजरातेतील द्वारका येथे होणार असल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या. इतकेच नाही तर गुजरात सरकारने त्यासाठी माझगाव डॉक लिमिटेडसोबत करार केला असल्याचेही बोलले जात आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदेंनी या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.







