| माणगाव | प्रतिनिधी |
दिवाळी व किल्ल्यांची मोठी परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लहांनगे, प्रौढ माणसे किल्ल्यांच्या प्रतिकृती आपल्या घरासमोर, सोसायटीच्या आवारात व सार्वजनिक ठिकाणी तयार करतात.
रायगड जिल्ह्यात किल्ल्यांची असलेली पार्श्वभूमी यामुळे दिवाळीतील किल्ले बांधणीला आगळेवेगळे महत्त्व आहे. दिवाळीनिमित्त बाजारपेठेतही तयार किल्ल्यांच्या प्रतिकृती विकण्यासाठी उपलब्ध झाल्या असून, विविध आकार, प्रकार यामध्ये या प्रतिकृती दिसून येत आहेत. प्रथम सत्र परीक्षा संपत असून, दिवाळीनिमित्त बच्चेकंपनी किल्ले बांधण्यात रमले असल्याचे दिसून येत आहेत. ज्येष्ठांचीही त्यांना मदत होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिकृती, सिंहासन, रांगोळी, गवत, मावळे, सैनिक, प्राणी यांना बाजारपेठेत चांगली मागणी असून, किल्ल्यांच्या प्रतिकृतीसाठी यांची ही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात दिवाळीचा उत्साह दिसून येत असून, बच्चेकंपनी किल्ले बांधण्यात व्यस्त असल्याने पालकांनी ही समाधान व्यक्त केले आहे.
दिवाळीनिमित्त दरवर्षी शाळेच्या व पालकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही किल्ले बांधतो. यावर्षी आम्ही मित्रांच्या मदतीने सुंदर अशी प्रतिकृती तयार करत आहोत. मातीचा किल्ला बांधण्यात काही वेगळाच आनंद असतो तो आम्हाला मिळत आहे.
नीरज सुतार,
विद्यार्थी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर किल्ले बांधणी करून ऐतिहासिक परंपरा जतन केली जाते. यातून कील्यांची माहिती मिळत असते व निर्मितीचा आनंद मिळतो. यावर्षी पुन्हा लहानगे किल्ले बनविण्यात व्यस्त असल्याने समाधान वाटत आहे.
श्रीकृष्ण गरधे,
शिक्षक







