| रसायनी | प्रतिनिधी ।
रसायनीतील आपटा गावाच्या हद्दीत नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीत अज्ञाताकडून अघोरी (जादूटोणा) प्रकार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या भयानक प्रकारामुळे संपूर्ण आपटा गावात आणि पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आपटा गावातील नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीत काही नागरिक गेले असता त्यांना हा धक्कादायक प्रकार दिसून आला. स्मशानभूमीत ज्या शेडखाली मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात, त्या ठिकाणच्या चारही खांबांना काळा दोरा बांधण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, तिथे नारळ, लिंबू आणि एका वांग्याला अनेक दोरे गुंडाळून ठेवत काहीतरी अघोरी कृत्य आणि जादूटोणा केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
स्मशानभूमीसारख्या ठिकाणी जिथे अंत्यसंस्कार केले जातात, तिथेच असा भयानक प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीची लाट पसरली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कोणत्यातरी भोंदूबाबाने किंवा अज्ञात व्यक्तीने स्वार्थासाठी हा जादूटोण्याचा प्रकार केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. 21 व्या शतकात आणि विज्ञानाच्या युगातही असे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार घडत असल्याने संतापही व्यक्त होत आहे. सदर अघोरी प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला, याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. या घटनेची पोलिसांनी आणि ममहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीफने (अंनिस) तातडीने गंभीर दखल घ्यावी. स्मशानभूमीत जाऊन असे कृत्य करणाऱ्या अज्ञाताचा शोध घेऊन त्याच्यावर ‘जादूटोणा विरोधी कायद्या’अंतर्गत कडक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आपटा गावातील नागरिकांकडून केली जात आहे.
आपटा स्मशानभूमीत अघोरी विद्येचा थरार!
