रोह्यातील शाळा विद्यार्थ्यांनी बहरल्या
खांब-रोहा | वार्ताहर |
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात दीड वर्ष शाळा बंद होत्या. पर्यायाने रोह्यातही शाळा बंद ठेवाव्या लागल्या. शासनाच्या नवीन धोरणानुसार सोमवार, 4 ऑक्टोबर रोजी रोहा तालुक्यासाह जिल्ह्यात शाळा सुरु झाल्या. रोहा तालुक्यातील रोहा, कोलाड, नागोठणे, चणेरा व घोसाळा विभागात शाळा सुरु झाल्या. त्यामुळे रोहा तालुक्यातील शाळा विद्यार्थ्यांनी बहरल्याचे चित्र दिसले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद असल्याचे दिसून आले.
रोहा तालुक्यातील शाळा नव्या उमेदीने पुन्हा एकदा कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरु झाल्या. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आश्रमशाळा सुरु न झाल्याने आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. तर, नागोठणेमधील जे.एच. अंबानी हायस्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांची आरटीपीसी आर टेस्ट घेऊन आम्ही शाळा सुरु करणार असल्याने चार दिवस शाळा उशिरा सुरु करणार असल्याचे संकेत शाळा व्यवस्थापनाने दिले.
शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करुन रोहा तालुक्यात शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. शासकीय आश्रमशाळा सानेगाव, ओम साई आश्रमशाळा नागोठणे, नेल्सन मंडेला आश्रमशाळा नागोठणे व जे.एच. अंबानी हायस्कूल नागोठणे या शाळा वगळता सर्व शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.
सादुराम बांगारे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, रोहा
शाळा हे विद्येचे माहेरघर आहे. विद्यार्थी शाळेत नसताना शाळेत भयाण शांतता निर्माण झाली होती. शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरीष येरुणकर, प्राचार्य, कोलाड हायस्कूल, कोलाड
शासनाने शाळा सुरु केल्याने खर्या अर्थाने मला आनंद होत आहे. शासनाच्या धोरणाचे आम्ही विद्यार्थी वर्ग स्वागत करीत आहोत.
संगीता विजय पाटील, विद्यार्थिनी, मेहंदळे हायस्कूल, रोहा.