सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्रीरामांच्या मंदिरात उद्या सोमवारी रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अवघी अयोध्यानगरी सजली असून, जोरदार तयारी सुरू आहे.
श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आठ हजार निमंत्रित सोमवारी दाखल होणार असून, दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यासाठी मंदिर फुलांनी आणि विशेष रोषणाईने सजविण्यात आले आहे. मंदिराबरोबरच संपूर्ण अयोध्या सजली असून, शहराला श्रीरामरंग आला आहे. ‘राम मंदिर नैसर्गिक फुलांनी सजविण्यात आले आहे. हिवाळ्यामुळे ही फुले अधिकाधिक ताजी राहू शकतात. फुलांचा दरवळ आणि सौंदर्यामुळे मंदिराच्या पावित्र्यात आणखी वाढ झाली आहे,’ अशी भावना मंदिराच्या विश्वस्तांनी व्यक्त केली. फुले आणि रोषणाईच्या सजावटीच्या दोन वेगळी पथके नेमण्यात आली आहेत. मंदिराच्या गर्भगृहात मात्र पारंपरिक दिवेच लावले जाणार आहेत.
मंदिरात 392 खांब
मंदिर तीन मजली असून, मुख्य मंदिरात पोहोचण्यासाठी भाविकांना पूर्वेकडून 32 पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. मंदिराचे संपूर्ण संकुल नगारा शैलीत बांधण्यात आले असून, पूर्व-पश्चिम असे 380 फूट लांबीचे, 250 फूट रुंद आणि 161 फूट उंच आहे. मंदिराचा प्रत्येक मजला 20 फूट उंच आहे. मंदिरात एकूण 392 खांब आणि 44 द्वार आहेत.
गर्भगृहाचे शुद्धीकरण
प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या गर्भगृहामध्ये 81 पवित्र ठिकाणांहून कलशातून आणण्यात आलेले जल शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले. पुष्पाधिवासासाठी विविध प्रांतातून फुले आणण्यात आली आहेत. भारताच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि ईशान्य भागातील 14 जोडपी ही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे यजमान असतील.
प्राणप्रतिष्ठापनेसाठी 22 जानेवारीचाच दिवस का?
सोमवार 22 जानेवारी रोजी शुभ मृगाशिरा नक्षत्र पहाटे 3 वाजून 52 मिनिटांनी सुरु होणार आहे. तसेच, मंगळवार 23 जानेवारीला पहाटे 4 वाजून 58 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त कायम राहणार आहे. परंतु 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजून 51 मिनिटे आणि दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. त्यामुळे 22 जानेवारी 2024 चा मुहूर्त हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवडण्यात आलाय.