भोगावती पुलाचा कठडा धोकादायक

| पेण | प्रतिनिधी |

खोपोली-पेण रस्त्यावरील भोगावती नदीच्या पुलाचा कठडा कोसळला असून, पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. वेळप्रसंगी गंभीर दुर्घटनेचा धोका वाढला आहे. त्यामुळे लवकर दुरुस्ती व्हावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

पुलाच्या दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकीकरणाकडून 35 लाख रूपये खर्च पूर्ण करण्यात आले आहे. या घटनेला सहा महिने ही उलटून गेलेले नाहीत, तोच त्याचे रेलिंग तुटून पडले आहे. रेलिंगला वापरलेले लोखंड निकृष्ट दर्जाचे असून, तेे सहज हाताने वाकू शकते, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. लाखो रुपये खर्च करुनही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पूर्ण काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, याला सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोपही नागरिक करीत आहेत.

पेणच्या दिशेने गेल्यास 11 नंबरचा गाळा, तर खोपोलीच्या दिशेने आल्यास 24 नंबरचा गाळा पूर्णतः तुटून पडलेला आहे. केव्हाही मोठा अपघात होउन दुर्घटना घडू शकते. परंतु याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. वेळेस तुटलेली रेलिंग दुरूस्त केली नाही तर भविष्यात मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या कामासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता रुपेश शिंगासने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. महत्त्वाची बाब म्हणजे, या पुलाचे काम हे रुपेश शिंगासने यांच्या देखरेखीखाली सुरू होते. ठेकेदाराविषयीदेखील माहिती देण्यास शिंगासने यांनी टाळाटाळ केली. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता रविंद्र कदम यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, दोन दिवसात पुलाचे काम दुरुस्त करून घेतले जाईल. मात्र, यांनीदेखील ठेकेदाराचे नाव सांगण्यास नकार देऊन फाइल पाहावी लागेल, असे सांगितले.

पुलाच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट गरजेचे
आजची पुलाची अवस्था पाहता खरंच या पुलाला 35 लाख खर्च झालेत की नाहीत, याबाबत नागरिक साशंकता व्यक्त करीत आहेत. कारण, जुन्याच रेलिंगला रंग लावून नवीन बसविल्याचे भासवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पुलासाठी सिमेंटचे पिल्लर उभे केलेत, त्यांची अवस्था पाहता एखाद्या वाहनाचा धक्का लागल्यास पिल्लर नदीत पडण्याची भीती आहे. तरी, याबाबत पुलाचे स्ट्र क्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे. तसेच कामाचे मूल्यांकन करणेदेखील गरजेचे आहे.
Exit mobile version