जिल्हाधिकारी कार्यालयाला झुडपांचा विळखा

भिंतीला तडे पडूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीलाच झुडपांनी विळखा घातला आहे. त्यामुळे भिंतींना तडा गेला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. रायगडच्या नव्या जिल्हाधिकार्‍यांसमोर इमारतीच्या स्वच्छतेबाबत मोठे आव्हान उभे राहिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, सामान्य, महसूल, निवडणूक, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी, वेगवेगळ्या विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार यांचे कार्यालय असून अनेक कर्मचारी या कार्यालयांमध्ये काम करीत आहेत.

कार्यालयात काम करताना कर्मचार्‍यांना वातावरण पोषक असावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची दुरुस्ती करण्यात आली. वेगवेगळ्या कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले. इमारतीला रंगरंगोटी केली. इमारतीच्या परिसरात सुशोभीकरण केले. त्यामुळे काम करणार्‍या कर्मचार्‍यांसह कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना कार्यालयात आल्याचे समाधान वाटत आहे. मात्र, सजावट, सुशोभीकरणासाठी केलेले लाखो रुपये पाण्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करतानाच इमारतीला झुडपांनी विळखा घातलेला आहे, काही ठिकाणी लहान मोेठी झाडे इमारतीमध्ये उगवली आहेत. त्यामुळे या इमारतीला तडे पडले असल्याचे दिसून येत आहे. याकडे रायगडचे नवे जिल्हाधिकारी जावळे लक्ष देतील का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहेे.

Exit mobile version