भिरा ठाणे एसटीची अवस्था बिकट

प्रवाश्यांचा असुरक्षित प्रवास

| सुधागड-पाली| वार्ताहर |

ठाणे आगारातून सुटणारी ठाणे भिरा हि एसटी सुरक्षित नसून बिकट प्रवासी वाहतुकीचा अट्टाहास आहे. या बसला पुढील व मागील दरवाजा नाही. एसटीच्या मागील खुल्या दरवाज्याला दोऱ्या बांधून हि बस जवळपास 125 किमी प्रवास करते. अनेक वेळा तक्रार करूनही हि एसटी सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचा असुरक्षित प्रवास होत असूनही दरवाज्यातून प्रवासी खाली पडून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या बाबतीत लक्ष घालून तातडीने दुसरी एसटी बस या मार्गावर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

सुधागड तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील रहिवासी हे ठाणे येथे राहतात. त्यामुळे भिरा येथून परतीचा प्रवास करताना एसटी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन ठाणे येथे पोहचते. अशा पूर्ण क्षमतेने सुरु असलेल्या एसटीला शहर वाहतुकीची बस देऊन महामंडळ वेळ काढूपणा का करत आहे, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. शहर वाहतुकीची बस असल्याने आतमध्ये सामान ठेवण्यासाठी वरच्या दोन्ही बाजूला कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे गैरसोय होते. प्रवासी मांडीवर आणि बाजूला सामान ठेवत असतात. याबाबत चालक व वाहक यांना विचारले असता गाडी बदलून द्या, असे सांगूनही चांगली बस देत नाही. त्यामुळे आम्हाला प्रवाशांसाठी हिच बस आणावी लागते असे सांगितले.

पाली ते खोपोली महामार्गावर बऱ्याच वेळा आरटीओची तपासणी सुरु असते. त्यांनाही दरवाजा नसलेली व दोऱ्या बांधलेली एसटी दिसत नाही का? महामंडळाच्या बसेस तपासणी करायच्या नाहीत असा काही नियम आहे का? राष्ट्रीय महामार्गावरून धावणारी हि बस सुस्थितीत आहे का, नाही याची तपासणी कोण करणार? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात.

अमित निंबाळकर, तालुका अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष.पाली
Exit mobile version