अलिबागच्या वन विभागाचे देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष; लाखो रुपयांचा खर्च पाण्यात
| रायगड | प्रमोद जाधव |
पर्यटनाला चालना देण्यासाठी लाखो रुपये खर्चून उभारलेले चौल-भोवाळे येथील स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता वन उद्यान आज वन विभागाच्या दुर्लक्षामुळे भकास झाले आहे. एकेकाळी पर्यटक आणि स्थानिकांच्या गर्दीने गजबजणाऱ्या या उद्यानाची दुरवस्था झाली असून, खेळाचे साहित्य मोडकळीस आले आहे. झाडाझुडपांनी संपूर्ण परिसराला विळखा घातला आहे. चार वर्षांपासून देखभाल-दुरुस्तीअभावी उद्यानाची अवस्था बिकट झाली असताना वन विभागाने मात्र त्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च अक्षरशः पाण्यात गेला असून, पर्यटकांसह स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
चौल परिसर धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. विविध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी येथे पर्यटकांची सतत वर्दळ असते. डिसेंबर महिन्यात दत्तजयंतीनिमित्त भोवाळे येथे श्रीदत्तांच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या पार्श्वभूमीवर पर्यटनाला चालना मिळावी आणि वनांचे महत्त्व स्थानिकांना समजावे, या उद्देशाने सुमारे सात वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागामार्फत चौल-वावे मार्गालगत हे जैवविविधता वन उद्यान उभारण्यात आले होते.
या उद्यानात विविध प्रकारच्या वनस्पती, फुलझाडांची लागवड करण्यात आली होती. ऐतिहासिक स्थळांसह वनसंपदेची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य, विविध प्राणी-पक्ष्यांचे पुतळे आणि निसर्गरम्य परिसरामुळे हे उद्यान पर्यटकांसह स्थानिकांचे आकर्षण ठरले होते. सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी येणाऱ्यांची येथे मोठी गर्दी होत असे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी हे उद्यान विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण बनले होते.
मात्र, सुरुवातीचा उत्साह आणि आकर्षण वन विभागाला टिकवता आले नाही. गेल्या चार वर्षांपासून देखभाल-दुरुस्तीचा अभाव असल्याने उद्यानाची दुरवस्था झाली आहे. खेळाचे साहित्य खराब झाले असून, गवत आणि झुडपांनी संपूर्ण परिसर व्यापला आहे. उद्यानात जाण्यासाठी पर्यटकांचा ओघ थांबला असून, एकेकाळी गजबजणारे हे पर्यटनस्थळ आता ओस पडले आहे. पर्यटनवाढीसाठी उभारलेल्या उद्यानाची अशी अवस्था होण्ो ही वन विभागाच्या नियोजनशून्य कारभाराची पावतीच आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेले उद्यान वापराविना पडून असल्याने सार्वजनिक पैशांचा अपव्यय झाला आहे. पर्यटनवाढीचा दावा करणाऱ्या वन विभागाने आता तरी या उद्यानाची दुरुस्ती करून ते पुन्हा पर्यटकांसाठी खुले करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चौल-भोवाळे परिसरात उभारण्यात आलेल्या वन उद्यानाची जमीन वन संरक्षित आहे. मागील काही वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाला सुशोभिकरणासाठी ही जागा दिली होती. सामाजिक वनीकरण विभागाने उद्यानासाठी खर्च केला होता. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सामाजिक वनीकरण विभागाची आहे.
– मिलिंद राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी, अलिबाग
