उपोषणकर्त्या दोन महिलांच्या प्रकृतीत बिघाड

रुग्णवाहिकेला झाला उशिर; रिक्षाने केले जिल्हा रुग्णालयात दाखल
| अलिबाग | प्रतिनिधी |

गेल्या महिन्याभरापासून जेएसडब्ल्यू विरोधात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सामुहिक उपोषणाचे हत्यार उगारले आहे. मात्र आजही प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे उपोषणकर्ते वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसून आले आहे. दोन उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली असून त्याला उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

मुरुड तालुक्यातील मिठेखार, चेहेर, वाघुळवाडी, नवीन चेहेर, निडी, साळाव, येथील 432 शेतकऱ्यांच्या 530 एकर जमीन 1989 साली सिकॉम कंपनीने शासनामार्फत कवडीमोल भावाने विकत घेतल्या. 530 एकर जमीनीपैकी 250 एकर जागेत प्रकल्प उभारण्यापासून वसाहतदेखील बांधण्यात आली. त्यामुळे 280 एकर जमीन पडीक झाली. बिर्ला कंपनीमार्फत प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र आजपर्यंत फक्त बोटावर मोजण्या इतक्या म्हणजे 70-80 जणांनाच कायम स्वरूपी नोकरी दिली. 16 जणांना ऑटोरिक्षा दिल्या. उर्वरित 361 प्रमाणपत्रधारक आजही वाढीव मोबदला व नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत.

नंतर 2009- 2010 मध्ये वेलस्पून कंपनीने चेहेर, मिठेखार, वाघुळवाडी, निडी येथील शेतकऱ्यांच्या 495 एकर जमीनी विकत घेतल्या. एकूण 126 शेतकऱ्यांच्या जमीनी प्रकल्पासाठी घेण्यात आल्या. त्यावेळी कंपनीने तीन वर्षात प्रकल्प आला नाही, तर मानधन चालू केला जाईल असे लेखी स्वरुपात लिहून दिले होते.
आता या जागेवर जेएसडब्ल्यू कंपनीचा प्रकल्प सुरु आहे. जेएसडब्ल्यू कंपनीकडून कराराचे उल्लंघन होत असताना, मोबदला, मानधनाचा प्रश्न मिटविण्यासाठी दलालामार्फत 16 लाख रुपये देण्याचे अमिष दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

याबाबत शेतकऱ्यांसोबत कंपनी प्रशासनाची चर्चा झाली नाही. त्यामुळे जेएसडब्लू विरोधात गेल्या महिन्याभरापासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. भविष्यात प्रकल्प आणायाचे असतील तर, शेतकऱ्यांच्या विकत घेतलेल्या जमीनी परत करा, अशी मागणी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी अजय चवरकर यांनी शेतकऱ्यांमार्फत केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या आमरण उपोषणामुळे अविता भास्कर ठाकूर व पुष्पा जनार्दन रोटकर या दोन महिलांची प्रकृती बिघडली असून त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या उपोषणाकडे प्रशासनाकडून ठोस भुमिका घेतली नसल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे उपोषणकर्ते वाऱ्यावर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

रुग्णवाहिका उशिरा, उपोणकर्त्यांमध्ये नाराजी
अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या अनेक दिवसांपासून मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात सहभागी झालेल्या महिलांपैकी दोन महिलांची प्रकृती बुधवारी दुपारी अचानक बिघडली. याबाबत अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी केली. परंतु रुग्णवाहिका वेळेवर न पोहचल्याने प्रकृती बिघडलेल्या दोन महिलांना अखेर रिक्षाने रुग्णालयात पाठविण्याची वेळ उपोषणकर्त्यांवर आली. रुग्ण प्रशासाच्या ढिसाळ कारभाराचा फटका उपोषणकर्त्यांना बसत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

Exit mobile version