भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांची जिल्हा परिषदेत तक्रार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील आगरदांडा येथील मुस्लिम मोहल्ला येथे बांधण्यात आलेल्या कब्रस्थानाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून तीन लाख खर्च दाखविलेल्या या कामात प्रत्यक्षात एक लाख रुपये देखील खर्च झालेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण नाईक यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीद्वारे बांधकामाची चौकशी करुन संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांची चौकशी करुन त्यांच्याकडून अपहार झालेला निधी वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सलमान गजगे, मोहम्मद असिफ डावरे, इरफान कादीरी, सज्जाद गजगे, झमीर चाऊस आदींच्या सह्या असलेल्या निवेदनानुसार गटविकास अधिकारी मुरुड यांनी दिलेल्या कार्यारंभ आदेशानुसार आगरदांडा मुस्लिम मोहल्ला कब्रस्थान येथे करारनामा तीन लाख खर्च करुन पत्रा छप्पर असणारी शेड बांधलेली आहे. परंतु सदर शेडचे करण्यात आलेले काम हे अतिशय निकृष्ट दर्जाची व गुणवत्ता हिन असून ग्रामस्थांच्या अंदाजानुसार एक लाख रुपयेही खर्च झालेला नाही. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार कनिष्ठ अभियंता मुकणे यांच्याकडे तक्रार करुन लक्ष वेधून देखील त्यांनी याची दखल घेण्याऐवजी ग्रामस्थांनाच तुम्ही आमच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे कोणतीही तक्रार करुन नका असा सल्ला देत आहेत. सतत तीन महिने तक्रार करुनही या कामाचे देयक सुद्धा अदा करण्यात आले आहे.
त्यामुळे स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यास जिपच्या कार्यकारी अभियंता यांनी या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी करुन शासकीय रकमेचा झालेला अपहार पाहून ग्रामस्थांना न्याय देत संबंधीत ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करुन त्यांच्याकडून झालेला खर्च वसूल करावा अशी मागणी केली आहे.