| रायगड | खास प्रतिनिधी |
अलिबाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्या रखडलेल्या कामाला आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
22 फेब्रुवारी 2022 रोजी या प्रकल्पाच्या कामाचा भूमीपूजन सोहळा पार पडला होता. अलिबाग तालुक्यातील उसर येथील नियोजित सरकारी वैद्यकीय महाविद्यालयच्या प्रशासकीय इमारत आणि रुग्णालयाचे काम ज्या कंपनीला दिले होते ते रद्द करण्यात आले होते. नव्याने निविदा काढून कामाला सुरुवात होणार होती. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत बैठक पार पडली आहे. लवकरच कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या सर्व पार पडून ऑक्टोबर अथवा नोव्हेंबरमध्ये कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.पूर्वा पाटील यांनी कृषीवलशी बोलताना दिली.
अलिबाग-उसर येथील 52 एकर क्षेत्रातील जागेत हा प्रकल्प उभारला जाणार आहे. 450 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये संरक्षित भिंत, शंभर एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 500 खाटांचा दवाखाना, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसाठी वसतिगृह अशा सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्याची मान्यता राज्य, केंद्र स्तरावर मिळाली आहे.