Nagaon Beach: उन्हाच्या झळांवर समुद्राच्या लाटांचा गारवा

नागाव किनाऱ्यावर पर्यटकांचे तोबा गर्दी

| अलिबाग | प्रतिनिधी |

राज्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट असून, तापमानात मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळेत नागरिकांना उकाड्याच्या झळा सहन कराव्या लागत असल्या तरी उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांकडे आकर्षित होत आहेत. विशेषतः अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजून गेला आहे.

मुंबई, पुणे तसेच राज्यातील विविध भागांतून आलेले पर्यटक कुटुंबासह समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. चिमुकले समुद्राच्या लाटांमध्ये खेळण्यात रमले असून, युवक-युवती जलक्रीडा, बोटिंग, बनाना राईड आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचा आनंद घेत आहेत. काही पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत तर काही जण नारळपाणी, आईस्क्रीम आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत उन्हाळ्याचा थकवा दूर करताना दिसत आहेत.

नागाव समुद्रकिनाऱ्यावर सकाळपासूनच पर्यटकांची वर्दळ सुरू होत असून, सायंकाळच्या वेळेत गर्दीत अधिक वाढ होत आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे व्यवसायालाही याचा मोठा फायदा होत आहे. स्थानिक व्यावसायिक, जलक्रीडा चालक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उन्हाळी पर्यटनामुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळत असून, नागावसह काशीद, मुरुड, अलिबाग आणि कोर्लई या समुद्रकिनाऱ्यांवरही पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, पर्यटकांनी समुद्रात उतरताना सुरक्षिततेचे नियम पाळावेत तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version