| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागाव हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस आले आहे. परंतु, येथील पणीप्रश्न बिकट होत चालला आहे. नागाव हद्दीत चार तलाव असून, त्या तलावांचे पाणी शुद्ध करुन वापरण्यास मिळाले तर नागावचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटू शकेल. त्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर करावा, यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना साकडे घालण्यात आले. नागाव सरपंच हर्षदा मयेकर यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबतचे निवेदन त्यांना सादर केले.
अलिबाग तालुक्यातील नागाव मध्ये एकूण चार तलाव आहेत, त्यामध्ये नैसर्गिक पाणी असून, या तलावाचे पाणी समस्त नागावकरांना शुध्द करून वापरण्यास मिळाले तर नागाव गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटू शकेल, त्यासाठी जलशुध्दीकरण प्रकल्पाची मंजुरी मिळावी, अशी मागणीचे निवेदन सरपंच हर्षदा मयेकर यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रत्यक्ष भेट देऊन निवेदनाद्वारे केली.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रास नागाव हे गाव पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिध्दीस आले आहे. या नागावमध्ये दररोज सरासरी 25 ते 30 हजार लोकांची वर्दळ असते. निसर्गाचे देणं असलेलं नागावला 4 किमीचा सागरी समुद्र किनारा लाभला आहे. स्वच्छ, सुंदर व सुरक्षित समुद्रकिनारा म्हणून नागाव समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.
नागाव गावाची लोकसंख्या सन 2024 नुसार 12 हजार इतकी आहे, गावासाठी पाणी पुरवठा हा सध्या उमटे धरणातून होत असतो. मात्र, उमटे धरणातदेखील आता तितका पाणीसाठा उपलब्ध नाही, त्या कारणाने नागाव ग्रामस्थांना जानेवारी ते जूनपर्यंत सरासरी 3 दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतो. नागावसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. या योजनेद्वारे नागावमध्ये अद्यापि कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही. शिवाय, मंजूर योजना नागावसाठी पुरेशीसुध्दा नाही, असे निवेदनात म्हटले आहे. त्याची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिली आहे.