प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शाळांची लागली वाट
| रायगड | प्रमोद जाधव |
पटसंख्येअभावी बंद पडलेल्या जिल्हा परिषदेच्या तीनशे शाळांची मतदानासाठी दुरुस्ती करण्यात आली होती. यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता. परंतु, हा खर्च आता पाण्यात गेला आहे. बंद पडलेल्या शाळा दुर्लक्षीत झाल्या आहेत. या शाळांकडे शिक्षण विभागाने पाठ फिरविल्याने आता शाळांच्या परिसरात गवत वाढले असून दारे, खिडक्या खराब होणे, भिंतीना तडे पडणे, भिंतीवरील रंग उडणे असा प्रकार होऊ लागला आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम सुरु करण्यात आले. शाळांमध्ये वेगवेगळे अभियान घेण्यात आले. दप्तराविना शाळा, खेळता खेळता शिक्षण सारखे उपक्रम राबवण्याबरोबरच पालक, शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. गावांमध्ये रॅली काढून जिल्हा परिषद शाळेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाळा बाह्य विद्यार्र्थ्यांना शोधून त्यांना जिल्हा परिषद शाळेत टिकून ठेवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले. तरीदेखील जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी होऊ लागली. जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा दर्जा नसल्याचा आरोप करीत अनेक पालकांनी अन्य शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पटसंख्येत दिवसेंदिवस घट झाली. वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला. जिल्ह्यातील 300 शाळा बंद करण्याची वेळ जिल्हा परिषद शिक्षण विभागावर आली. गेल्या पाच वर्षापासून या शाळा बंद स्थितीत आहेत. फक्त निवडणूकीच्या कालावधीत मतदान केंद्र म्हणून या शाळेला नवा साज चढविण्याचे काम केले जाते. परंतु इतर वेळेला मात्र शिक्षण विभागाचा साधा कर्मचारीदेखील फिरकत नसल्याचे चित्र आहे. रायगड जिल्हयातील अलिबाग, पेण, पनवेल, उरण, महाड, श्रीवर्धन, कर्जत या सात विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीचे मतदान 20 नोव्हेंबरला होते. मतदान केंद्र सुसज्ज असणे आवश्यक होते. त्यामुळे बंद पडलेल्या शाळांची दुरुस्ती करून त्यांचा मतदान केंद्र म्हणून वापर करण्यात आला होता. शाळांमधील परिसर स्वच्छ करण्याबरोबरच मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी बंद शाळांमध्ये पाणी, वीज, स्वच्छतागृह अशा सुविधा उपलब्ध करण्याचे काम बांधकाम विभागामार्फत करण्यात आले होते. बंद पडलेल्या दुर्लक्षीत शाळा मतदानामुळे पुन्हा बोलक्या झाल्या होत्या.
गरज सरो आणि वैद्य मरो अशी अवस्था बंद पडलेल्या जिल्हा परिषद शाळांची झाली आहे.मतदानाची पुर्ण झाल्यावर या शाळांकडे पाठ करण्यात आली आहे.त्यामुळे या शाळा दुर्लक्षीत झाल्या आहेत. पुन्हा शाळेच्या परिसरात गवत वाढण्यापासून, दारे खिडक्या खराब झाल्या आहेत. भिंतीवरील रंग उडू लागले आहे. त्यामुळे शाळा ओसाड झाल्या आहेत.लाखो रुपयांचा दुरुस्तीवर झालेला खर्च पुन्हा एकदा वाया गेला आहे.
बंद शाळांचा योग्य वापर आवश्यक
बंद पडलेल्या शाळांचा वापर फक्त निवडणूकीच्या कालावधीत केला जात आहे. इतर वेळेला या शाळा दुर्लक्षीत राहत आहेत. करोडो रुपयांचा खर्च करून जिल्हा परिषद शाळा बांधण्यात आल्या. या दुर्लक्षीत शाळांचा वापर इतर वेळेला योग्य वापरासाठी केल्यास या शाळांमधील बहर कायम टीकून राहण्याची शक्यता आहे.
