। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या महापालिकेकडे हस्तांतरित न केलेल्या 14 शाळांच्या दुरुस्तीसाठी पंचायत समितीने महापालिकेकडे परवानगी मागितली होती. या शाळांना दुरुस्तीसाठी आवश्यक परवानगी महापालिकेने दिली आहे.
पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 मध्ये स्थापन झाली. त्यावेळी पूर्वीच्या नगरपालिकेबरोबरच त्यामध्ये ग्रामीण भागाचाही समावेश करण्यात आला. या ग्रामीण भागातील 52 जिल्हा परिषदेच्या शाळा पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट झाल्या. या शाळा जिल्हा परिषदेने महापालिकेकडे हस्तांतरित केलेल्या नाहीत. त्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने महापालिकेने त्याबाबत अनेक वेळा जिल्हा परिषदेकडे या शाळा हस्तांतर करण्याची मागणी केली, पण जिल्हा परिषदेने अद्याप त्या शाळांचे हस्तांतर केलेले नाही.याबाबत पनवेल पंचायत समितीकडे संपर्क साधला असता पनवेल पंचायत समितीने या शाळा महापालिका हद्दीत येत असल्या तरी त्या शाळांच्या इमारती जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असल्याने यातील 14 शाळांची दुरुस्ती जिल्हा नियोजन मंडळ व एसडीआर फंडातून करण्यासाठी निधी मंजूर करून दुरुस्तीसाठी महापालिकेकडे ना हरकत मागितली असल्याचे सांगितले. त्याला पनवेल महापालिकेच्या शिक्षण व बांधकाम खात्याने मंजुरी दिली आहे.
दुरुस्ती करण्यात येणार्या शाळा
वळवली, खुटरी, कळंबोली, पडघे, तळोजे पाचनंद म., पालेखुर्द, खिडुकपाडा, ओवे कॅम्प, ओवेपेठ म., टेंभोडे, ओवे खुर्द, तळोजे मजकूर, पापडीचापाडा, करवले