पंतप्रधानांच्या दौर्यामुळे चर्चा लांबणीवर
| नाशिक | प्रतिनिधी |
महाविकास आघाडीकडून सोमवारी (दि.29) उमेदवारी अर्ज दाखल होणार असताना महायुतीमध्ये लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाचा तिढा अद्यापही कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा असल्याने महायुतीचे वरिष्ठ नेते दौर्यात गुंतल्याने कुठलीही चर्चा झाली नाही. त्यामुळे इच्छुक पुन्हा नाशिकमध्ये परतले. 43 दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा महायुतीमध्ये अद्यापही सुटलेला नाही. त्या तुलनेत महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. महायुतीकडून भाजपतर्फे पूर्वचे आ. अॅड. राहुल ढिकले यांचे नाव आघाडीवर आहे. भाजपच्या वरिष्ठांकडून सूचना आल्यास उमेदवारीसंदर्भात भाजपकडून तातडीने हालचाली गतिमान होतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेनाही (शिंदे गट) नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहे.
ठाण्याच्या बदल्यात नाशिक किंवा नाशिकच्या बदल्यात ठाणे, असा अदलाबदलीचा फॉर्म्युला निश्चित होऊ शकतो. मात्र नाशिकसाठी शिंदे गटाने आग्रह धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र भुजबळांनी उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात होत असलेला विलंब लक्षात घेऊन स्वतः माघार घेत असल्याची घोषणा केली. मात्र, अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकच्या जागेचा आग्रह सोडलेला नाही. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये ट्विस्ट निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन 43 दिवस झाले. परंतु महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्याने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात आहेत







