चिंच, कैरीच्या कापांना विशेष मागणी
| खांदेश्वर | प्रतिनिधी ।
पनवेलच्या विविध भागांत हातगाड्यांवर चिंच, आवळे, कैरी आणि बोरांची विक्री सुरू झाली आहे. आंबट-गोड पदार्थांची क्रेझ पुन्हा एकदा पनवेल शहरात पाहायला मिळत आहे.
हातगाडीवर मांडलेले आंबट-गोड पदार्थ पाहून लहान मुलांपासून महिला वर्गापर्यंत अनेकांची पावले थांबत आहेत. आंबट चिंच, गोड चिंच, छोटे आवळे, स्टार फळ, कैरीच्या कापा यांना विशेष मागणी आहे. यासोबतच सुकलेली बोरं, मोठी बोरं, छोटी बोरं आणि संत्रीही हातगाड्यांवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मीठ-मसाला लावलेल्या कैरीच्या कापांची चव अनेकांना भुरळ घालत आहे. चिंच आणि आवळ्याचा आंबटपणा, त्यावर मीठ-मसाल्याची चव यामुळे जिभेला अक्षरशः पाणी सुटत आहे. शाळकरी मुलांमध्येही या आंबट-गोड पदार्थांची विशेष उत्सुकता दिसून येत आहे. मात्र, सध्या महिला वर्गाकडूनही या पदार्थांना मोठी पसंती मिळत आहे. बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिला हातगाड्यांवर थांबून आवडीचे पदार्थ खरेदी करताना दिसत आहेत. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगातही जुन्या चवींची क्रेझ कायम असल्याचे चित्र आहे.
लहानपणी शाळेबाहेर चिंच-बोरं खाण्याच्या आठवणी अनेकांच्या गप्पांचा विषय बनत आहेत. आंबट-गोड चवीमुळे या पदार्थांना सर्व वयोगटातील नागरिकांकडून मागणी वाढत आहे. विशेष म्हणजे विविध प्रकारच्या चिंच, आवळे आणि बोरांची आकर्षक मांडणी ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. हातगाडीवरील या पारंपरिक पदार्थांना पॅकबंद खाद्यपदार्थांच्या तुलनेत वेगळीच पसंती मिळत आहे. संध्याकाळच्या वेळी शाळा, बाजारपेठ आणि वर्दळीच्या ठिकाणी या हातगाड्यांभोवती गर्दी होत आहे. पनवेलमध्ये सध्या चिंच-आवळे आणि आंबट-गोड पदार्थांची ही क्रेझ चर्चेचा विषय ठरत आहे.







