18 राज्यांना बसणार तडाखा, रेड अलर्ट जारी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
हवामान विभागाने दिलेल्या इशार्यानुसार सध्या देशावर दोन चक्रीवादळाचं संकट येणार आहे. पहिलं चक्रीवादळ हे इराकहून उत्तर भारताकडे सरकलं आहे. तर, दुसरं चक्रीवादळ बांग्लादेशमधून येत आहे. उत्तर भारतामध्ये आता उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून, तापमानात मोठी वाढ झाली आहे. मात्र, पुढील काही दिवसांमध्ये नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या चक्रीवादळामुळे दिल्ली आणि दिल्लीच्या शेजारील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यासोबतच पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीमध्येदेखील जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिहार, पश्चिम बंगालसह पूर्वेकडी राज्यात या काळात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर, अरुणाचल प्रदेशला बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिणेकडील राज्यातदेखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या काळात वार्याचा वेग हा प्रतितास 60 किमीपेक्षा अधिक असू शकतो, त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असं आयएमडीनं म्हटलं आहे.