। मुंबई । प्रतिनिधी ।
कोल्हापूर जिल्ह्यातील ढोलगरवाडी (ता.चंदगड) येथील एका लघुदाब औद्योगिक ग्राहकास वीजचोरी करणे महागात पडले आहे. वीजचोरी प्रकरणी भाऊराव संभाजी पाटील (वय 40) यांना गडहिंग्लज न्यायालयाने एका वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. या ग्राहकाने वीजमीटरमध्ये छेडछाड करून 24 हजार 675 वीज युनिटची, आर्थिक मुल्याप्रमाणे 2 लक्ष 50 हजार रूपयांची वीजचोरी केली होती.
ढोलगरवाडी येथील वीजग्राहक भाऊराव संभाजी पाटील यांच्या सातेरी राईस मिलच्या वीजमीटरची पंचासमक्ष घटनास्थळी तपासणी करण्यात आली होती. प्रथमदर्शनी वीज मीटरचे पीव्हीसी सील तुटलेले व स्टिकर सील संशयास्पद स्थितीत आढळून आले. क्युचेक यंत्राच्या सहाय्याने वीज मीटर तपासणी केली. या तपासणीत वीजमीटर संथ गतीने फिरत असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला. पंच व ग्राहकांसमक्ष सक्षम अधिकारी यांनी वीज मीटर सील केले. वीज मीटरची गडहिंग्लज येथे दि.20 नोव्हेंबर 2015 रोजी वीज भार तपासणी करून पंचनामा करण्यात आला.
या वीजभार तपासणीत वीजमीटर 75.94 टक्के संथ गतीने फिरत असल्याचे आढळून आले. पुन्हा पंच व ग्राहकांसमक्ष सक्षम अधिकारी यांनी वीज मीटर सील केले. दि.21 नोव्हेंबर 2015 रोजी कोल्हापूर येथील वीज तपासणी प्रयोगशाळेत ग्राहकांसमक्ष वीज मीटर तपासले. या तपासणीत वीज मीटरमध्ये वीज वापर कमी नोंदवला जावा, अशा पध्दतीने फेरफार केल्याचे सिद्ध झाले.
ग्राहकाने वीजचोरीच्या 22 फेब्रुवारी 2014 ते 19 नोव्हेंबर 2015 या निर्धारित 19 महिने कालावधीत 24 हजार 675 युनिटची वीजचोरी केली. ग्राहकास वीजचोरीच्या युनिटचे आर्थिक मुल्यानुसार 2 लक्ष 50 हजार रुपये व तडजोडीचे 1 लक्ष 50 हजार इतके बिल देण्यात आले होते. मात्र नोटीस देऊनही ग्राहकाने वीजबिल भरले नसल्याने महावितरणच्या फिर्यादीनुसार भाऊराव संभाजी पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत गडहिंग्लज न्यायालयाने आरोपीस एक वर्षाची साधी कैद व 10 हजार रुपये दंडाची, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद ही शिक्षा ठोठावली आहे.
याप्रकरणी पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) निवृत्त कमांडर शिवाजी इंदलकर यांचे मार्गदर्शन लाभले. भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अमित बोकील व सहकार्यांनी ही कारवाई केली होती. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. सुनिल तेली यांनी कामकाज पाहिले.