रायगडातील धरणांनी तळ गाठला

धरणांमध्ये अवघा 35 टक्केच साठा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 35 टक्के साठा शिल्लक आहे. यामुळे सुधागड, पेण, कर्जत, महाड पोलादपूर व खालापूर तालुक्यांतील 35 गावे आणि 113 पाड्यांतील नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकंतीची वेळ आली आहे. एकीकडे पावसाळा सुरू होण्यास अजून 40 दिवस शिल्लक असताना दुसरीकडे महिनाभरात जिल्ह्यातील पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रायगडात पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 7 कोटी 61 लाख 58 हजार रुपयांचा पाणी टंचाई आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यात 1 हजार 328 गावे व वड्यांवर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. परंतु नेमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे कोट्यवधींच्या पाणी त्यांची आराखड्यांनंतर देखील रायगड जिल्हा टँकर मुक्त करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

रायगड जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडूनही पाणी साठविण्याचे योग्य नियोजन नसल्याने दरवर्षी रायगड जिल्ह्यातील गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यंदा देखील पाणी टंचाईच्या झाला तीव्र होण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल महिना अद्याप संपलेला नाही. असे असताना रायगड जिल्ह्यातील 35 गावे आणि 113 वाड्यांना 23 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाई जाणवणार्‍या गावांमध्ये कर्जत तालुक्यातील 1 गाव 3 वाड्या, खालापूर तालुक्यातील 5 गावे, 5 वाड्या, पेण तालुक्यातील 17 गावे, 49 वाड्या, सुधागड तालुक्यातील 1 वाडी, महाड तालुक्यातील 10 गावे, 50 वाड्या आणि पोलादपूर तालुक्यातील 2 गावे, 5 वाड्यांचा समावेश आहे.

धरणावर दृष्टिक्षेप
धरणाचे नाव – टक्के
फणसाड – 26, श्रीगाव – 24, कोंडगाव – 43, घोटवडे -37, ढोकशेत – 32, वेळे – 43, कार्ले – 41, कुडकी – 42, रानिवली – 13, खैरे – 42, साळोख – 43, वसरे -27, भिलवले – 44, डोणवत -31, बामणोली – 42, पुनाडे – 40

पन्नास टक्ंक्याहून अधिक साठा
मोरबे – 53,कलोते-मोकाशी – 56,पाभरे – 75,वाव -60,सुतारवाडी -61,उन्हेरे – 63,आंबेघर – 78,उसरण – 80,संदेरी – 55,वरंध – 53,खिंडवाडी – 53,कोथुर्डे – 64

कृती आराखडा दृष्टिक्षेप
उपाययोजना : गावे : वाड्या : अपेक्षित खर्च
विहिरी खोल करणे गाळ काढणे : 31 : 44 : 80 लाख 7 हजार
टँकर, बैलगाडीने पाणी पुरवठा : 258 : 688 : 3 कोटी 44 लाख 15 हजार
नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती : 22 : 1 : 1 कोटी 19 लाख 85 हजार
नविन विंधन विहिरी : 70 : 137 : 1 कोटी 90 लाख 2 हजार
विंधन विहिरी दुरुस्ती : 34 : 43 : 27 लाख 49 हजार

Exit mobile version