। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणार्या व लाखो भाविकांच्या नवसाला पावणार्या आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली आहे. गुरुवारी (दि.12) सकाळी देवीचा कौल घेऊन तारीख निश्चित करण्यात आली. यंदा ही जत्रा 22 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे.
आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच जत्रेचा दिवस ठरविण्यात येतो. गुरुवारी सकाळी देवीचा कौल घेऊन तारीख निश्चित करण्यात आली. यावेळी जत्रोत्सवाला 10 लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मालवणमधील भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह राज्याच्या कानाकोपर्यातून येत असतात. या जत्रेला भाविकांची मोठी गर्दी असते. विशेष म्हणजे या जत्रेत सामान्य जनासह राजकिय नेतेमंडळी, कलाकारही उपस्थिती लावत असतात.
आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी ‘याची देही याची डोळा’ पाहून आयुष्याचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येत असतो. याच लाखो भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली आहे.
पूर्व तयारीला लवकरच प्रारंभ
प्रथेनुसार देवीला कौल लावून जत्रेची तारीख निश्चित झाली आहे. आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खासगी वाहनांच्या बुकिंगसाठी चढाओढ लागली आहे. जत्रेची तारीख आता जाहीर झाल्याने पूर्व तयारीला लवकरच प्रारंभ होणार आहे. जत्रेच्या तारीख ठरविण्याचा कौल झाल्यानंतर श्री देवी भराडी मंदिर गुरुवारी 12 डिसेंबर ते 14 डिसेंबर असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे. मंदिरात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही याची भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबियांनी केले आहे.