रुग्णांसह कर्मचाऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात सध्या दुर्गंधीचा सामना रुग्णांना आणि येथील कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. या रुग्णालयाची वीज गायब झाल्यावर ही दुर्गंधी वाढते. त्यामुळे रुग्णालयाच्या अधीक्षकांनी नवीन शवपेटी आणि खेळती हवा राहील, असे शवागार बांधण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
डॉ नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात दररोज दोनशेहून अधिक बाह्यरुग्ण सेवा तर 50 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शंभर खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयात रक्तशुद्धीकरण सुविधा सकाळपासून रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत दोन सत्रांमध्ये दिली जाते. वर्षाला एक हजारांहून अधिक शव विच्छेदनासाठी या रुग्णालयात येतात. यातील अनेक शव बेवारस असल्याने त्या शवांचा अंत्यविधी होईपर्यंतचा 20 पेक्षा अधिक दिवस रुग्णालयातील शवपेट्यांमध्ये ही शवं ठेवावी लागतात. या शवागारात 10 शवपेट्या आहेत. त्यापैकी 6 शवपेट्या सुरू आहेत. चार शवपेट्या वर्षभरापासून कार्यान्वित नाहीत. काही दिवसांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी रुग्णालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी 4 शवपेट्या उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. अद्याप या शवपेट्या रुग्णालयात कार्यान्वित झाल्या नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे रुग्णालय बांधताना केलेल्या चुकीच्या कामामुळे दुर्गंधीसारख्या समस्येला तोंड द्यावे आहे.
रुग्णालय बांधकामावेळी शवागाराचे ठिकाण रुग्णालय इमारतीपासून वेगळे होते. मात्र, न्यायालयाने शवागाराच्या बांधकामाला ‘जैसे थे’ हुकूम दिल्यामुळे शवागाराचे काम थांबले आणि तात्पुरते शवागार रुग्णालय इमारतीच्या तळमजल्याखालील जागेत सुरू करण्यात आले. सध्या याच ठिकाणी शवविच्छेदन केले जाते. शवविच्छेदनाला स्वतंत्र वातानुकूलीत यंत्रणा नव्हती. वर्षभरापूर्वी पाठपुरावा करुन या शवविच्छेदन खोलीला वातानुकुलीत यंत्रणा रुग्णालयाचे अधीक्षक मधुकर पांचाळ यांनी करुन दिली. परंतु, शवपेटींची संख्या कमी असल्याने शवांना उघड्यावर किंवा एकाच शवपेटीमध्ये दोन शव ठेवण्याची वेळ येत आहे. या स्थितीत वीज गायब झाल्यास रुग्णालयात दर्प सुटतो. सध्या याच दर्पाचा सामना करुन रुग्ण उपचार घेतात आणि आरोग्य कर्मचारी, डॉक्टर उपचार देतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालयाच्या तळमजल्याखाली शवागाराची सोय करुन त्याला हवा खेळती राहण्यासाठी एकही खिडकी न ठेवल्याने दुर्गंधीचा प्रश्न कायम राहिला. रुग्णालय अधीक्षकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला नवीन शवागार बांधण्याचे मागणीपत्र दिले. रुग्णालय इमारतीमध्ये तळमजल्याखाली असणारे हे राज्यातील पहिले शवागर आहे.
लोकवर्गणीतून दुरुस्ती उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित झाल्यावर फेब्रुवारी 2020 ला शवागरातील शवपेट्यामधील वातानुकूलीत यंत्रणा सुरु करण्यासाठी पनवेल शहरातील टिळक मित्र मंडळाच्या सदस्य चंद्रशेखर सोमण, मिलिंद गांगल, डॉ. मयुरेश जोशी यांच्यासह अनेकांनी 2 लाख रुपयांची लोकवर्गणी जमा करुन धूळखात पडलेल्या शवपेट्या सुरू करुन दिल्या. त्यानंतर शहरातील डॉ. प्रमोद गांधी यांच्या सामाजिक संस्थेने सहकार्य करुन अजून चार शवपेट्या रुग्णालयात सुरू करून दिल्या.
मजुरांची वानवा शवागाराच्या देखभालीची जबाबदारी ही फॉरेन्सीक डॉक्टर यांची असते. सामाजिक संस्थांनी मदत केल्यानंतर तरी रुग्णालयाने संबंधित वस्तूंची निगा ठेवणे गरजेचे होते. रुग्णालयाने मागणी केल्यानंतर रहिवाशांनी कृतार्थ भावनेने त्यांच्या ऐपतीनुसार होईल तेवढे सहकार्य करावे एवढीच पनवेलकरांची अपेक्षा आहे. शंभर खाट्यांच्या रुग्णालयासाठी अवघे सहा मजूर स्वच्छतेसाठी. 15 मजुरांची येथे आवश्यकता आहे.