2023 चा विश्वचषक आज आपल्या निम्म्या टप्प्यापर्यंत पोहोचला. यजमान भारत 9 पैकी 5 सामने जिंकून पैकीच्या पैकी म्हणजे दहा गुणासह अव्वल स्थानावर आहे. भारताविरुद्धची लढत गमावून न्यूझीलंड आणि हॉलंडसारख्या नवशिक्या संघाविरुद्ध लढत गमाविणारा दक्षिण आफ्रिका संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. म्हणजे चौथ्या स्थानासाठी निम्म्या विश्वचषक वाटचालीनंतर स्पर्धा आहे, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि अफगणिस्तान यांच्यात. यामध्ये पुढे बदलही होऊ शकेल. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की, गतविजेता इंग्लंड संघ आणि माजी विजेता श्रीलंकेचा संघ अगदी तळाशी आहेत. त्यांच्या डोक्यावर हॉलंड व अफगाणिस्तान हे संघ असावेत याचेच आश्चर्य वाटते.
भारतातील हवामान, खेळपट्टी, मैदान आणि परिस्थिती यांच्याशी जुळवून घेणारे संघ सध्या पुढे आहेत. दुखापती ही दीड महिन्याच्या मोठ्या स्पर्धेत मोठी समस्या असते. श्रीलंका संघाने कप्तानासह काही महत्त्वाचे खेळाडू गमविले. इंग्लंड संघ तर, प्रमुख खेळाडू स्टोक्स जो निवृत्तीतून बाहेर येऊन आपल्या संघासाठी खेळतोय, त्याच्या समस्येमुळे हवालदिल झाला आहे. इंग्लंडचा विद्यमान कप्तान जोस बटलर याला आयपीएल स्पर्धेतील त्याचा फॉर्म काही सापडला नाही. खरं तर आयपीएल स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंना या विश्वचषकात अधिक चमकण्याची संधी आहे. मात्र ही संधी फलंदाजांपेक्षा गोलंदाजांना अधिक आहे असे वाटते. गोलंदाजांमध्ये फिरकी गोलंदाजांना भारतातील खेळपट्ट्यांवर पूर्वी खेळल्याचा अनुभव यावेळी कामाला येत आहे. फलंदाजांच्या बाबतीत दोन गोष्टी आहेत. ऑक्टोबरचे उष्ण हवामान, प्रचंड उकाडा याचा फटका फलंदाजी करणाऱ्यांना अधिक बसत आहे. पावसाळा सरत असल्याने सर्व खेळपट्ट्या ताज्यातवान्या आहेत. त्यामुळे त्या हेतुपुरस्सर खराब केल्या नाहीत तर फलंदाजीसाठी अधिक सहाय्यक ठरत आहेत. मात्र त्याचा लाभ उठविणारे खेळाडू संघात हवेत. दक्षिण आफ्रिकेने धुमधडाक्यात सुरुवात केली. श्रीलंकेविरुद्ध सलामीला त्यांनी 428 धावा फटकाविल्या. डिकॉक (100), ड्युसेन (108), मार्करम (106) या फलंदाजांनी हात धुवून घेतले. फलंदाजांनी हात साफ केले असेच म्हणावे लागेल. मात्र त्यांची हॉलंडविरुद्धची अनपेक्षित हार त्यांची मोठ्या स्पर्धेत गळपटण्याची वृत्ती दाखवून देणारी होती. पण दक्षिण आफ्रिका संघ लवकरच त्यातून सावरला त्यांनी नंतरच्या लखनौ येथील सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात केली. तोच आत्मविश्वास पुढे नेत त्यांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड आणि बांगलादेश यांना अक्षरश: धुतले. दुसरीकडे इंग्लंड संघ मात्र अपेक्षांच्या विपरीत 4 पैकी तीन सामने गमावून बसला आहे.
गतविश्वचषकातही इंग्लंड संघ असाच अडखळत होता. मात्र त्यावेळी तो संघ घरच्या मैदानांवर खेळत होता. प्रेक्षक त्यांच्या पाठीशी होते. त्यांचे खेळाडू फॉर्मात होते. हवामानही, त्यांना अनुकूल होते. यावेळी त्या गोष्टींची सभा नसताना इंग्लंडला चमत्कार करावा लागणार आहे. त्याचे सर्व खेळाडू फिट नाहीत. वेगवान गोलंदाज भारतीय खेळपट्ट्यांवर जम बसवू शकले नाहीत. वेगवान गोलंदाज भारतीय खेळपट्ट्यांवर अजूनही प्रभाव दाखवू शकले नाहीत. दुसरीकडे पहिल्या दोन लढती गमावून यंदाच्या विश्वचषकात खराब सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियानेही आपल्याला लवकरच सावरले. श्रीलंका, पाकिस्तान, हॉलंड यांच्याविरुद्धच्या लढती जिंकून पहिल्या चार संघांच्या चौकटीमधील स्थान कायम ठेवले आहे. श्रीलंका, पाकिस्तान यांच्या फिरकी गोलंदाजांचे भारतीय खेळपट्ट्यांवरील अपयश, अंतिम चार संघात भारत हा आशिया खंडातील एकमेव देश असेल हेही निश्चित केले आहे. मात्र 45 दिवसांच्या या स्पर्धेत उत्तरार्धाच निर्णायक ठरतो. आरंभी फॉर्म पकडणारे संघ अखेरपर्यंत टिकतातच असे नाही. उशिरा फॉर्मात आलेला संघ अंतिम रेष पारही करतो.
Email: vinayakdalvi41@gmail.com