5 फेब्रुवारीला मतदान, 8 फेब्रुवारीला मतमोजणी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून, 5 फेब्रुवारीला मतदान, तर मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी (दि. 7) पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 10 जानेवारी रोजी निघणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी आहे. उमेदवारी अर्जांची छाननी करण्याची तारीख 18 जानेवारी आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी असेल. त्याचप्रमाणे 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होत निकाल जाहीर होणार आहेत.
दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) भाजप आणि काँग्रेसला धोबीपछाड देत जबरदस्त विजय मिळवला होता. या निवडणुकीत आपने 70 पैकी 62 जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपला अवघ्या 8 जागांवर विजय मिळाला होता. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ने दिल्लीत वर्चस्व राखले होते. दिल्लीत बहुमतासाठी 36 ही मॅजिक फिगर आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांच्यासह आपच्या प्रमुख नेत्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा काही प्रमाणात डळमळीत झाली आहे. याशिवाय, सलग 10 वर्षे सत्तेत असल्यामुळे सत्ताधारी आपविरोधात अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टर निर्माण झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.