महाडकरांकडून निषेध व्यक्त
| महाड | प्रतिनिधी |
महाडमधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांची आणि वैद्यकीय पदांची कमतरता असल्यामुळे या ठिकाणी योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. याबाबतीत अनेक वेळा चर्चा होऊनदेखील कायम दुर्लक्ष केले गेले आहे. काही दिवसांपूर्वी महामार्गावर झालेल्या अपघातात महाडमधील चार जणांचा मृत्यू झाला होता. यातील जखमींवर योग्य उपचार झाला नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे ट्रॉमा केअरबाबत अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाडकरांनी मूक मोर्चाद्वारे दिला आहे.
महाड शहरामध्ये शासनाकडून महान ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारीच महाड ट्रॉमा सेंटर उभे केले. हे रुग्णालय उभे झाल्यापासूनच या ठिकाणी योग्य उपचारांची आणि डॉक्टरांची वानवा आहे. या ठिकाणी इतर सुविधादेखील उपलब्ध नसल्याने रुग्णांना शहरांमध्ये पैसे खर्च करून उपचार करून घ्यावे लागत आहेत. तर अनेक वेळा मुंबईसारख्या ठिकाणी पदरमोड करत उपचारासाठी जावे लागत आहे. पोलादपूरपासून माणगावपर्यंत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये जखमींना आणल्यानंतर अधिक उपचाराकरिता मुंबईसारख्या ठिकाणी नेण्याचा सल्ला देण्यात येतो. महाडपासून मुंबईला जाण्यासाठी सुमारे चार तासांचा प्रवास करावा लागतो. यादरम्यान योग्य उपचार मिळाल्यास रुग्ण बचावू शकतो. अपघातामध्ये अनेक रुग्ण या ठिकाणी उपचार न मिळाल्यामुळे मुंबईमध्ये स्थलांतर करत असतानाच दगावले आहेत. काही दिवसांपूर्वी वीर रेल्वे स्थानकासमोर झालेल्या भीषण अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले होते. यातील दोन जण जागीच ठार झाले, तर उर्वरित जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. मात्र, अधिक उपचाराकरिता मुंबईमध्ये हलवण्याचा सल्ला दिला आणि यादरम्यान हे जखमी दगावल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. याबाबतीत मंगळवारी (दि. 7) महाडमधील काही नागरिकांनी महाड ग्रामीण रुग्णालयाच्या गलथान कारभाराविरोधात मूक मोर्चा काढण्यात आला.
शहरातून हा मोर्चा महाड उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर घेण्यात आला. या ठिकाणी नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने आणि इतर सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांचे रुग्णांचे हाल होत आहेत, याबाबत शासनाने ठोस पावले उचलली नाहीत तर महाडकर नागरिक यापुढे तीव्र आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.