शासन, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
| माणगाव | सलीम शेख |
माणगाव व तळा तालुक्याच्या मातीतून तब्बल 77 स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, तर अनेकांनी अमानुष कारावास, हालअपेष्टा व अन्याय सहन केला. त्यांच्या पवित्र स्मृती जपण्यासाठी माणगाव येथील जुन्या पंचायत समितीच्या आवारात उभारण्यात आलेले स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक आज मात्र शासन व प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अक्षरशः विदारक अवस्थेत पोहोचले आहे.
स्वातंत्र्याला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्य सरकारच्या पुढाकारातून हे स्मारक उभारण्यात आले होते. कालांतराने नवीन तहसील कार्यालय सुरू झाल्यानंतर स्मारक स्थलांतरित करण्यात आले. मात्र, त्यानंतर या स्मारकाकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीने किंवा शासकीय यंत्रणेने ढुंकूनही पाहिले नाही, ही धक्कादायक बाब समारे आली आहे.
आज स्मारकाच्या परिसरात गवताचे साम्राज्य, कचरा आणि अस्वच्छता दिसू येते. स्मारकावर कोरलेली स्वातंत्र्य सैनिकांची नाव धुळीच्या जाड थराखाली झाकली गेली असून, अनेक ठिकाणी अक्षरे अस्पष्ट झाली आहेत, तर काही नावे पूर्णपणे अदृश्य होण्याच्या मार्गावर आहेत. ज्यांनी देशासाठी हसत-हसत बलिदान दिले, तुरुंगवास भोगला, अत्याचार सहन केले, त्यांच्याच नावांचा सन्मान पुसला जात आहे, हे दृश्य अत्यंत वेदनादायक आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे, या स्मारकात ज्यांची नावे कोरलेली आहेत, त्यांपैकी बहुतांश स्वातंत्र्य सैनिक आज ह्यात नाहीत. जिवंत असताना अपेक्षित मान-सन्मान न मिळालेल्या या देशभक्तांच्या स्मृतींनाही मृत्यूनंतर उपेक्षा सहन करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्या स्वातंत्र्यामुळे आज आपण मुक्त श्वास घेतो, त्या स्वातंत्र्याच्या शिल्पकारांनाच विसरणे हे राष्ट्र म्हणून आपले अपयश नाही का? असा थेट सवाल आता माणगावकर उपस्थित करत आहेत. या ऐतिहासिक स्मारकाचे तातडीने नूतनीकरण, नियमित स्वच्छता, संरक्षक व्यवस्था व योग्य देखभाल करण्यात यावी, तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींना पुन्हा सन्मानाचे स्थान मिळावे, अशी जोरदार व भावनिक मागणी तालुक्यातून होत आहे. किमान आता तरी शासन व लोकप्रतिनिधींनी गाढ झोपेतून जागे होऊन ठोस पावले उचलावीत, अन्यथा स्वातंत्र्य सैनिकांच्या अपमानाविरोधात नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही संतप्त नागरिकांकडून दिला जात आहे.
