पालकमंत्रीपदापेक्षा जिल्ह्याचा विकास महत्त्वाचा- आदिती तटकरे

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

रायगडचा पालकमंत्री कुणीही झाला तरी जिल्ह्याच्या भवितव्य व विकासासाठीच काम करेल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत निर्माण झालेला वाद व पेच यावर बोलताना त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात करताना जिल्ह्यातील महिला व बालक यांच्या संदर्भात संपूर्ण जिल्ह्याचा आढावा महिला व बालकल्याण मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला सुचिक यांच्याकडून घेतला.


शिंदे, फडणवीस, पवार सरकारमधील पहिल्या महिला मंत्री म्हणून मान मिळवलेल्या रायगडच्या मंत्री आदिती सुनिल तटकरे यांची महिला व बालविकास मंत्री पदी वर्णी लागली. त्यानंतर ना. तटकरे यांनी शनिवारी (दि.15) पाली सुधागड येथील अंगणवाडी केंद्राची पाहणी केली. तसेच, नानोसे सुधागड येथील महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत नानोसे येथील शेळी प्रकल्पास भेट दिली व बचत गटाच्या महिलांशी चर्चा केली. महिला व बालकांच्या उत्कर्षासाठी नवनवीन अभिनव व उपयुक्त अशा योजना राबविणार असून, या सर्व योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आदिती तटकरे म्हणाल्या.

रायगड जिल्ह्यातील अंगणवाड्या व महिलांच्या प्रकल्प इमारती यांची माहिती घेऊन जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणार आहे. महिलांचे प्रश्न व धोरणे यांची सविस्तर माहिती घेऊन लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विभागाच्या वतीने चांगले काम करण्यासाठी प्राधान्य असेल असेही त्या म्हणाल्या. यावेळी चिमुकल्यांनी आदिती तटकरे यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी आदिती तटकरे यांनी लहानग्यांसोबत गोड संवाद साधला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंत्री आदिती तटकरे यांचे जंगी स्वागत केले. दरम्यान, पाली सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार, पंचायत समिती कृषी अधिकारी अशोक महामुनी, अंगणवाडी सेविका यांच्या वतीने साक्षी दिघे यांनीदेखील आदिती तटकरे यांचे स्वागत केले.

Exit mobile version