स्वच्छतेचा बोजवारा; प्रवाशांकडून संतापाचा उद्रेक
| रेवदंडा | प्रतिनिधी |
राज्य परिवहन महामंडळाच्या अलिबाग-पनवेल या गजबजलेल्या मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली असून, प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वातानुकूलित सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवशाही बस प्रत्यक्षात मात्र अस्वच्छ, जीर्ण आणि गैरसोयीच्या अवस्थेत धावत असल्याचे चित्र आहे.
अलिबागहून पनवेल आणि पुन्हा पनवेलहून अलिबाग असा सतत फेऱ्यांचा ताण असतानाही बसची स्वच्छता होत नसल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. अनेक बसमध्ये एसी ब्लोअर तुटलेले किंवा निकामी आहेत, सीट्स खराब अवस्थेत आहेत, पडदे व सीट कव्हर वर्षानुवर्षे धुतले गेलेले नाहीत. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, बस स्थानकांतील स्वच्छतेची स्थितीही चिंताजनक आहे. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बस स्थानक स्वच्छता अभियान’ अंतर्गत राज्यभर पाहण्या होत असल्या तरी रेवदंडा बस स्थानकासारख्या ठिकाणी परिस्थिती अजूनही निकृष्टच असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छता गृह, बाकडे, कॅन्टीन आणि विश्रांतीगृहांची नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
विशेष म्हणजे, स्वच्छता गृहासाठी 2 रुपये शुल्क आकारले जात असताना प्रत्यक्षात स्वच्छतेचा अभाव जाणवत असल्याने हा ‘स्वच्छता कर’ प्रवाशांच्या रोषाचा विषय ठरत आहे. इतक्या उत्पन्न देणाऱ्या मार्गावरही स्वच्छतेसाठी आवश्यक उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. लालपरी व साध्या बसांची स्थितीही काही वेगळी नाही. अनेक बसमध्ये आपत्कालीन दरवाजे दोऱ्यांनी बांधलेले आहेत, खिडक्या निकामी आहेत. काही चालकांकडून तंबाखू-गुटखा खाऊन बसमध्येच थुंकण्याचे प्रकार होत असल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. अशा चालकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः या मार्गावरील बस व स्थानकांची पाहणी करून प्रवाशांच्या तक्रारींवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा स्वच्छतेच्या मुद्द्यावर जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलिबाग डेपो व्यवस्थापक देवरे यांनी बस व स्थानकांतील स्वच्छता सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात कोणताही बदल जाणवत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी कायम आहे. रात्री 8:30 नंतर बसच नाही, स्थानकावरील स्वच्छता गृह अस्वच्छ, कॅन्टीन बंद. एवढ्या उत्पन्न देणाऱ्या मार्गावरही ही अवस्था असेल तर सामान्य प्रवाशांनी काय अपेक्षा ठेवायची?, अशी प्रतिक्रिया पनवेल येथील प्रवाशाने बोलून दाखवली.
मूल्यांकन समिती येऊन गेली, पण बस स्थानक अजूनही कचऱ्याचा ढीगच आहे. बाळासाहेबांचे स्वच्छता अभियान फक्त कागदावरच आहे का? सरनाईक साहेबांनी स्वतः येऊन वास्तव पाहावे, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू.
विनोद नाईक,
रेवदंडा प्रवासी
शिवशाही बस म्हणजे एसीच्या नावाखाली लूटच! ब्लोअर बंद, सीट्स घाणेरड्या, ड्रायव्हर गुटखा थुंकतात. 2 रुपये स्वच्छता कर घेतला जातो, पण स्वच्छता कुठे आहे? महिला प्रवाशांसाठी तर ही परिस्थिती अधिकच लाजिरवाणी आहे.
श्रेया पाटील,
नियमित प्रवासी
