मारळ गावातील स्मशानाची दुरवस्था

विकासाच्या गप्पांचा फुगा फुटला; उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

एकीकडे विकासाची गंगा वाहत असल्याचे दावे सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या थाटामाटात केले जात असताना, दुसरीकडे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांची अत्यंत दयनीय आणि चिंताजनक अवस्था समोर येत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध हरिहरेश्वर पर्यटन क्षेत्राजवळ असलेल्या मारळ ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीची विदारक स्थिती प्रशासनाच्या उदासीनतेचे आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. गावात स्मशान शेडच नसल्यामुळे ग्रामस्थांना अक्षरशः उघड्यावर अंत्यविधी करावे लागत आहे. त्यामुळे विकासाच्या गप्पांचा फुगा फुटला असून मरणानंतरही मरण याताना भोगाव्या लागत असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

मारळ गावातील स्मशानभूमीतील दहनकट्टा आणि त्यावरील शेड अनेक वर्षांपूर्वीच पूर्णपणे मोडकळीस येऊन नष्ट झाली आहे. कालांतराने त्याची अवस्था इतकी खराब झाली की, सध्या त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी कोणतीही योग्य सुविधा उरलेली नाही. गावात एखाद्याचा मृत्यू झाल्यास नातेवाईक आणि ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. विशेषतः पावसाळ्यात मुसळधार पावसात आणि उन्हाळ्यात कडक उन्हात अंत्यविधी करताना ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. मृत व्यक्तीला शेवटचा निरोप देताना देखील गावकऱ्यांना अशा कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हरिहरेश्वरसारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळाच्या जवळ असलेल्या या गावात स्मशानभूमीसारखी मूलभूत आणि अत्यावश्यक सुविधा नसणे हे प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणे असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. तालुक्यात विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील साध्या आणि अत्यावश्यक गरजांकडेच दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव मारळ गावातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

आश्वासनांची खैरात
या गंभीर प्रश्नाबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायत, संबंधित विभागातील अधिकारी तसेच मतदारसंघातील लोकप्रतिनिधींकडे लेखी आणि तोंडी मागणी केली आहे. मात्र, प्रत्येक वेळी केवळ आश्वासनांची खैरात मिळाली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विकासाच्या नावावर मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना गावातील ही स्मशानभूमी का दिसत नाही? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आंदोलनाचा इशारा
मृत्यू हा आयुष्याचा शेवटचा टप्पा असला तरी, मृत्यूनंतरही माणसाला सन्मानाने निरोप देण्यासाठी आवश्यक सुविधा नसणे ही प्रशासनाची मोठी निष्क्रियता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता तरी शासन आणि स्थानिक प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन मारळ येथील स्मशानभूमीची तातडीने दुरुस्ती करावी आणि नवीन शेड उभारून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. अन्यथा येत्या काळात ग्रामस्थांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.
Exit mobile version