गणपती विसर्जन घाटाची दुरावस्था

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नदीचे नाल्यात रूपांतर; नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

बोर्ली पंचतन येथील गणपती विसर्जन घाटाची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय बनली असून ग्रामपंचायतीच्या सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे नदीचे अक्षरशः नाल्यात रूपांतर झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा, साचलेले घाण पाणी, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून यामुळे स्थानिक नागरिकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

गावातील अनेक नागरिकांनी सांगितले की, गणपती विसर्जनासारख्या धार्मिक परंपरेशी जोडलेल्या घाटाची अशी अवस्था होणे हे गावासाठी लाजिरवाणे आहे. विसर्जन घाट परिसरात पावसाळ्यानंतर तर परिस्थिती अधिकच बिकट बनते. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, कचऱ्याचे ढीग आणि साचलेल्या घाण पाण्यामुळे हा परिसर अक्षरशः कचऱ्याच्या डेपोमध्ये बदलल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा विषय अनेक वेळा ग्रामसभेत मांडण्यात आला, अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासने देण्यात आली आणि प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाच्या कामकाजावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावातील लोकांनी या कचऱ्याच्या दुर्गंधीतून चालण्याची सवयच लावून घ्यायची का? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अनेक जण या मार्गाने रोज ये-जा करतात; मात्र परिसरात असलेल्या कचऱ्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे नाक दाबूनच या रस्त्यावरून जावे लागते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेली अनेक वर्षे विविध राजकीय सत्ताधाऱ्यांच्या काळात हा गणपती विसर्जन घाट कचरा आणि प्लास्टिकने भरलेला राहिला. अनेकांनी याबाबत लेखी तक्रारी केल्या, ग्रामसभेत आवाज उठवला; मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. त्यामुळे आता स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गणपती विसर्जन घाट हा केवळ धार्मिक स्थळ नसून गावाच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. मात्र घाट परिसरातील घाण आणि कचरा पाहून भाविकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान बोर्ली पंचतन मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात येत असल्याने स्थानिक नागरिकांकडून या प्रश्नाकडे विशेष लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आंदोलनाचा इशारा
गावातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर या प्रश्नावर तातडीने कारवाई झाली नाही तर नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. गणपती विसर्जन घाट परिसराची तातडीने स्वच्छता करून प्लास्टिकमुक्त करणे, कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावणे आणि परिसराचे सुशोभीकरण करणे या मागण्या आता जोर धरत आहेत.
Exit mobile version