मंत्री भरत गोगावले यांची माहिती
| मुंबई | प्रतिनिधी |
महायुतीची सत्ता स्थापन होऊन 100 दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे, मात्र रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप काही सुटला नाही. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे पालकमंत्री पदावर ठाम आहेत. तसेच मंत्री अदिती तटकरे यांना देखील जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास आहे. त्याचवेळी मंत्री गोगावले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर रात्री उशिरा पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असा विश्वास व्यक्त केला.
रायगड पालकमंत्री पदासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी रायगड जिल्ह्यातील आमदार भरतशेठ गोगावले हे रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न रखडलेला आहे. अशातच आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सुद्धा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी भरत गोगावले हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, याच मुद्याला घेऊन आज मुख्यमंत्री सभागृहात गेले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात आल्यानंतरच भरतशेठ गोगावले म्हणाले की, आम्हाला वेळ पाहीजे आहे यावर उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी आपण थोड्यावेळाने भेटू असे उत्तर दिले. त्यामुळे या भेटी नंतर तरी रायगडच्या पालकमंत्रीपदावर तोडगा निघणार का? हे पाहणे औत्सुक्याचेे ठरणार आहे.