आश्रमशाळेतील 197 विद्यार्थी संशयित; फक्त पाच विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाची औषधे
। नेरळ । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात शासनाच्या कुसुम योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये 197 विद्यार्थी हे कुष्ठरोगी आढळले होते. मात्र, त्यातील केवळ पाच विद्यार्थ्यांना कुष्ठरोग संबंधित औषधे देण्यात आली आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने केवळ पाच विद्यार्थ्यांना ही औषधे का दिली? आणि उर्वरित 192 विद्यार्थ्यांना कुष्ठरोगी म्हणून औषधे का दिली नाहीत, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यात कुष्ठरोग निर्मूलन करण्यासाठी ‘कुसुम’ ही योजना राबवली. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळेतील विद्यिर्थ्यांच्या कुष्ठरोग तपासणीची माहिती सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी मागितली होती. त्यामध्ये एकूण 30 आश्रमशाळेतील 8 हजार 552 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील 197 विद्यार्थी संशयीत होते. परंतु, त्यातील केवळ पाच विद्यार्थ्यांनाच औषधे सुरू करण्यात आली होती. आणि त्या पाच विद्यार्थ्यांपैकी वरवने येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनी खुशबू नामदेव ठाकरे हिचा मृत्यू झाला आहे. परंतु, या कुष्ठरोग तपासणीच्या माहितीत खुशबू ठाकरे हिची मृत्यूच्या नोंदीची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे खुशबूच्या मृत्यूनंतर आवाज उठवला नसता तर खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूची चौकशी झालीच नसती आणि अकस्मात मृत्यूची नोंद होऊन फाईल बंद झाली असती, असा दावा आणि आरोप नंदा म्हात्रे यांनी केला आहे. तसेच, शासकीय आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची सिकलसेल अॅनिमिया तपासणी, बायोप्सी तपासणी न करता त्यांना कुष्ठरोगी ठरवण्यात आले आहे. हे पूर्णपणे चुकीचे असून असे कारण करणार्या आरोग्य खात्याच्या अधिकारी कर्मचार्यांवर कारवाई कधी होणार, असा सवाल देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
तपासणी न करताचा विद्यार्थ्यांना औषधे
संशयित कुष्ठरोगी म्हणून आढळून आलेल्या किमान 197 विद्यार्थ्यांची आरोग्य विभागाने प्रथम डर्मोलॉजिस्ट यांच्याकडून तपासणी करून घेणे गरजेचे होते. ज्या विद्यार्थ्यांना औषधे सुरू करण्यात आली त्यांची सिकलसेल अॅनिमिया तपासणी केली अथवा नाही या विषयी देखील कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे एकूणच आरोग्य विभाग आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी गंभीर नसल्याचे यावरून दिसून येत आहे. तरी, या विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी सांगितले आहे.
आरोग्य खात्याचे अपयश
खुशबूच्या मृत्यूचा क्लिनीकल अॅनालीसेस अहवाल आणि जिल्हा आरोग्य विभाग तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांचा चौकशी अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अजूनही आरोग्य खात्याच्या अधिकार्यांवर गुन्हा दाखल झालेला नाही. हे आरोग्य विभागाच अपयशच आहे. त्यामुळे आरोग्य खात्याचे अपयश लपविण्यासाठी आश्रमशाळेतील शिक्षकांना जबाबदार धरले जात आहे.