‌ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचे दरवाजे बंदच

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पावसाळ्यात शासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किल्ल्याचे दरवाजे बंद करण्यात आले होते. रविवारी तीन महिन्यांनी पुरातत्व विभाग किल्ल्याचे दरवाजे उघडणार असल्याने पर्यटकांनी राजपुरी जेट्टी व खोरा बंदरावर गर्दी केली होती. परंतु हवामान बदलामुळे पुरातत्व विभागाने जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उघडले नसल्याने पर्यटकांचा व स्थानिक व्यवसायिकांचा हिरमोड झाला आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने किल्ल्यात ये-जा करणाऱ्या बोट मालकांनी बोटी किनाऱ्यावरून बाहेर काढल्या. किल्ल्याचे दरवाजे उघडले गेले नाहीत. वातावरण चांगले झाले की, समुद्रात बोटी उतरवल्या जातील आणि किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी उघडले जातील. आमच्याकडुन सर्व तयारी झाली आहे अशी माहिती सहाय्यक संवर्धक पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येळीकर यांनी दिली.


जंजिरा पर्यटक सहकारी संस्था मर्यादित राजपुरीचेसंस्थापक नाझीम कादरी म्हणाले की, निसर्गापुढे कोणाचे काहीही चालू शकत नाही. सकाळपासून वारा व समुद्राच्या लाटा उसळत आहेत. त्यामुळे बोटी किनाऱ्यावर घेतल्या आहेत. शासनाने 48 तासांची मुदत दिली आहे. हवामान चांगले राहिले की बोटी समुद्रात काढल्या जातील, असे नाझीम कादरी यांनी सांगितले.

Exit mobile version