महाराष्ट्राची दुहेरी मुकुटाला गवसणी

पुरुषांमध्ये 39वे, तर महिलांमध्ये 25वे जेतेपद

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

महाराष्ट्राच्या दोन्ही (पुरुष व महिला) संघांनी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करताना अजिंक्यपदावर मोहोर उमटवली. महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाने रेल्वे संघावर, तर महाराष्ट्राच्या महिला संघाने भारतीय विमान प्राधिकरण संघावर विजय साकारत झळाळता करंडक पटकावला. पुरुषांचे हे 39 वे, तर महिलांचे 25 वे जेतेपद ठरले.

नवी दिल्ली येथील करमाळी सिंग क्रीडांगण येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने डबल धमाका केला. गेल्या काही वर्षांतील रेल्वेचा दबदबा या वर्षी महाराष्ट्राने मोडून काढला. या वर्षी महाराष्ट्राने तिन्ही विभागांत विजेतेपद मिळवताना एकूण सहा अजिंक्यपद मिळवली. यामध्ये सब ज्युनिअर गटातील दोन व ज्युनिअर गटातील दोन व खुल्या गटातील दोन अशा एकूण सहा विजेतेपदांचा समावेश आहे.

महिला विभागातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने भारतीय विमान प्राधिकरणावर 3.20 मि. राखून सहज दोन गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळे (2.20, 2.20 मि. संरक्षण व 4 गुण), संपदा मोरे (1.10, 1.40 मि. संरक्षण), अश्‍विनी शिंदे (2.10, 1.10 मि. संरक्षण व 4 गुण), काजल भोर (6 गुण) यांनी छान खेळ केला.

रंगतदार सामन्यात सरशी
पुरुषांच्या अंतिम सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या खेळात महाराष्ट्राने पारंपरिक प्रतिस्पर्धी रेल्वेचा 52-50 पराभव केला. महाराष्ट्राला जादा डावात विजयासाठी 10 गुणांची गरज होती. डाव संपण्यासाठी एक मिनीट शिल्लक असतानाच महाराष्ट्राला जिंकण्यासाठी एक गुणाची गरज होती. शेवटचे दोन सेकंद असताना गडी बाद करत महाराष्ट्राने रेल्वेवर मात केली.
Exit mobile version