| बन्सबेरिया । प्रतिनिधी ।
पश्चिम बंगालमधील बन्सबेरिया येथे सुरु असलेल्या 41 व्या राष्ट्रीय कुमार-मुली खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र कुमार संघाने बाद फेरीत प्रवेश केला तर मुलींनी उपउपात्य फेरी गाठली. कुमारांच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राने झारखंडचा 20-9 असा एक डाव 11 गुणांनी दणदणीत पराभव केला. महाराष्ट्र संघातर्फे सुरज झोरे ने (2.10, 2.20 मिनिटे संरक्षण व 1 गुण) गणेश बोरकरने (2.10, 2.20 मिनिटे संरक्षण व 2 गुण), निखिल (2.40 मिनिटे संरक्षण ) विवेक ब्राम्हणे (4 गुण ) यांनी चांगला खेळ केला. झारखंड तर्फे हर्ष (1.20 मिनिटे संरक्षण ) निखिल (1 मि. व 2 गुण) यांनी खेळ केला. तर दुसर्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने मणिपूरचा 21-5 असा एक डाव 16 गुणांनी धुव्वा उडवत अ गटात अव्वल स्थान पटाकावत बाद फेरीत प्रवेश मिळवला.
मुलींच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने हरियाणाचा 11-13 असा एक डाव 8 गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राच्या अश्विनी शिंदेने (4 मि. संरक्षण ) प्रीती काळे (2.40 मि. संरक्षण ) संपदा मोरे (2 मि. संरक्षण व 2 गुण) वृषाली भोये (3 गुण) व कल्याणी काळे (3 गुण) यांनी विजयात महत्वाची कामगिरी केली. तत्पूर्वी मुली गटातील साखळी सामन्यात महाराष्ट्र ने झारखंडचा 18-6 असा एक डाव 12 गुणांनी धुव्वा उडवत अ गटात अव्वल स्थान पटकवत बाद फेरी गाठली. यात प्रणाली काळे (3.30 मि. संरक्षण ) सानिका चाफे (2.10 मि. संरक्षण ) दीपाली राठोड (4 गुण) पायल पवार (1.10 मिनिटे ) यांनी चांगला खेळ केला.