। उरण । वार्ताहर ।
भेंडखळ गावातील खाडीच्या नाल्यावरील साकवाच्या पायाची हळूहळू पडझड सुरू झाली आहे. यामुळे रात्री अपरात्री हा साकव केव्हाही पडून रहदारी करणार्या रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भिती भेडखळ गावातील रहिवासी व्यक्त करत आहेत.
भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत सध्या ग्रामपंचायत फंडातून सिडको तसेच इतर शासकीय योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लावली जात आहेत. परंतु, रहिवाशांच्या रहदारीसाठी महत्वाचा असलेल्या गावातील खाडीच्या नाल्यावरील साकवाच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष केंद्रित करण्यास कोणाला ही वेळ मिळत नाही. यामुळे साकवाचा पाया हळूहळू कमकुवत होत चालला आहे. ही अशीच परिस्थिती राहिली तर रात्री अपरात्री हा साकव पडून रहदारी करणार्या रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. याआधी फुंडे व धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील साकव पडून एका कामगाराचा तसेच मासेमारीसाठी गेलेल्या आदिवाशी बांधवांचा मुत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरी ती पुनरावृत्ती पुन्हा घडू नये यासाठी या साकवाचे दुरुस्तीचे किंवा नव्याने काम हाती घेण्यात यावे, असे भेडखळ येथील शिवाजी ठाकूर यांचे म्हणणे आहे.