प्रशासनाकडून अंगणवाडी सेविकांना वेठीस
| पेण | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा ‘महिला सशक्तीकरण’ या मथळ्याखाली रोहा येथे 1 ऑक्टोबर रोजी कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी 50,000 महिला जमविण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना वेठीस धरायला सुरुवात केली आहे. गुरुवारी पेण येथे तहसील कार्यालयात अंगणवाडी सेविकांची बैठक तहसीलदारांनी लावली होती.
या बैठकीमध्ये प्रत्येक अंगणवाडी सेविकेने लाडकी बहीण योजनेतील सहा लाभार्थींना रोहा येथील कार्यक्रमात आणण्याची सक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी जमा होणार आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम 29 तारखेला रोहा येथे ठेवण्यात आला होता. परंतु, 50,000 महिला जिल्ह्यातून जमविणे शक्य होत नसल्याने हा कार्यक्रम 1 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती मिळाली. अंगणवाडी सेविकांना तुटपुंजे मानधन मिळत असल्याच्या विरोधात अंगणवाडी सेविकांच्या प्रतिनिधी आझाद मैदानावर उपोषणाला बसल्या आहेत. त्यांना भेट देण्यास मुख्यमंत्र्यांना व महिला बालविकास मंत्र्यांना वेळ नाही. परंतु, आपल्या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी याच अंगणवाडी सेविकांना वेठीस धरले जात आहे. मानधनाचा विचार केल्यास मानधनापेक्षा मोठ्या प्रमाणात अंगणवाडी ताई ग्रामीण भागात आरोग्यासह इतर सर्व बाबींवर काम करताना दिसतात. लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणीदेखील याच अंगणवाडी सेविकांनी केली. असे असताना गर्दी वाढवायलादेखील अंगणवाडी सेविकांना शासन त्रास देत आहे.
कोणावरही सक्ती नाही
पेण तहसील कार्यालयात अंगणवाडी सेविकांच्या बैठकीसंदर्भात तहसीलदार तानाजी शेजाळ यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क करुन विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविकांची बैठक आम्ही घेतली होती; परंतु त्यांच्यावर कोणतीच सक्ती केलेली नाही. फक्त आम्ही लाभार्थी महिलांना आवाहन करण्यास सांगितले आहे.
कार्यक्रम दुपारहून आहे. मात्र, अंगणवाडी सेविकांना सकाळी 9 वाजता जमण्यास सांगितले असून, महिलांना नेण्यासाठी खास बसची व्यवस्था केली आहे. तर, गडब येथे फुड पॅकेटचीसुद्धा व्यवस्था केली आहे. एकंदरीत, कार्यक्रमात गर्दी जमा करण्यासाठी अधिकारीदेखील अंगणवाडी सेविकांनाच वेठीस धरत आहेत.