| पनवेल | वार्ताहर |
खारघर सेक्टर-11 मधील नाल्यालगत असलेल्या झाडाच्या आड कठड्यावर बसून काही मद्यपी रात्री मद्य प्राशन करीत असल्यामुळे नाला परिसर मद्यपींचा अड्डा म्हणून ओळखला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. खारघर सेक्टर-6 कडून शिव मंदिरमार्गे सेक्टर-11 कडे जाणार्या नाल्याशेजारी सिडकोने दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात मोकळी जागा सोडली आहे. सदर जागेवर रस्त्यालगत असलेल्या सोसायटी आणि रो हाऊसमधील नागरिकांनी वाहने उभी करण्यासाठी जागेवर कब्जा करुन काहींनी झाडे लावली आहेत.
नाल्याच्या कडेला असलेली झाडे आणि रात्री परिसरात अंधार असल्यामुळे मद्यपी झाडाआड आणि नाल्यालगत असलेल्या कठड्यावर रात्री अकरा ते एकदरम्यान मद्य प्राशन करीत आहेत. खारघर सेक्टर-11 मधील नाल्यालगत मद्य प्राशन करु नये, अशी विनंती करुनही काही मद्यपी मद्यपान करतात. मद्य प्राशन करताना अनेक वेळा दोन गटात वाद झाल्याचे प्रकार या परिसरात घडले आहेत. या परिसरात पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.