| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुका या 18 डिसेंबर रोजी पार पडत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 2 डिसेंबर असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरण येथील निवडणूक निर्णय कार्यालयात मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी गर्दी केली होती.
उरण तालुक्यात एकूण 33 ग्रामपंचायती असून, त्यापैकी जसखार, करळ, पाणजे, नवीन शेवा, घारापुरी, डोंगरी, बोकडविरा, भेंडखळ, नवघर, पागोटे, पुनाडे, धुतूम, रानसई, कळंबुसरे, पिरकोन, सारडे, वशेणी अशा 18 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांनी गावागावात आघाडी, युतीच्या माध्यमातून भक्कम मोर्चेबांधणी करण्यासाठी सुरुवात केली आहे. शुक्रवारी (दि.2 डिसेंबर) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक इच्छुकांनी आपापल्या कुटुंबासह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.