माणगाव शहरातील गटारे तुडुंब

परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव शहरातील मोरबा रोडच्या दुतर्फा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने गटारे बांधली आहेत. परंतु, ती गटारे तुंबली असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि जीवनमान धोक्यात आणणारी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गेली पाच वर्षे ही समस्या स्थानिक नागरिकांना भेडसावत आहे.

नगरपंचायत आणि महामार्ग प्राधिकरण यांच्यातील जबाबदारीच्या वादामुळे या गटारांची गेल्या पाच वर्षांत एकदाही नीट साफसफाई झालेली नाही. परिणामी ही गटारे आज कचरा, गाळ व सांडपाण्याने तुडुंब भरली असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

दिघी-माणगाव-पुणे हा महत्त्वाचा महामार्ग मोरबा रोड मार्गे माणगाव शहरातून जातो. सन 2020 मध्ये हा महामार्ग पूर्ण झाला असला, तरी त्यासोबत बांधण्यात आलेली गटारे अनेक ठिकाणी आजही अपूर्णावस्थेत आहेत. काही ठिकाणी ही गटारे पूर्णपणे उघडी असून त्यांची खोली सुमारे पाच फूट आहे. अंधारात किंवा पावसाळ्यात या उघड्या गटारांमध्ये पडून अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही संबंधित यंत्रणांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, या गटारांची कामे अपूर्ण असल्याचे कारण देत माणगाव नगरपंचायतीने साफसफाईची जबाबदारी टाळली, तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वारंवार सूचना आणि तक्रारी करूनही या प्रश्नाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या निष्काळजीपणाचा फटका थेट शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिकांना बसला आहे.

या गटारांमधील तुंबलेले सांडपाणी थेट खांदाड परिसरातील शेतजमिनीत सोडण्यात आल्याने हजारो हेक्टर शेती बाधित झाली आहे. भातशेती व कडधान्यांची पिके नापीक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली असली, तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. तसेच, पावसाळ्याच्या काळात या तुंबलेल्या गटारांमुळे परिस्थिती आणखी भयावह होते. खांदाड, मोरबा रोड, सिद्धीनगर, एसटी बसस्थानक परिसर आणि बामणोली रोड या भागांत दरवर्षी पुरसदृश परिस्थिती निर्माण होते. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य, फर्निचर आणि घरांची संरचना यांचे मोठे नुकसान होते. वर्षानुवर्षे होणाऱ्या या त्रासामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी वेळोवेळी आवाज उठवला. मात्र, आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कृती न झाल्याने नागरिकांचा विश्वास ढासळत चालला आहे.

तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
वर्षानुवर्षे होणाऱ्या या त्रासामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान, मोरबा रस्त्यावरील गटारांची तातडीने साफसफाई, अपूर्ण कामे पूर्ण करणे आणि प्रभावी पाणी निचरा व्यवस्था उभारणे यासाठी त्वरित पावले उचलावीत. अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा स्पष्ट इशारा खांदाड, सिद्धीनगर आणि मोरबा रस्ता परिसरातील नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील, अशी भावना देखील संतप्त नागरिक व्यक्त करत आहेत.

माणगावमधील गटार सफाईच्या कामाला आपण नगरपंचायतीचे सफाई कामगार लावून बामणोली रोडपासून सुरुवात केली असून शहरातील मोर्बा रोड मार्गासह सर्व गटारांची स्वछता लवकरात लवकर करण्यात येईल.

-संतोष माळी,
मुख्याधिकारी, नगरपंचायत माणगाव

Exit mobile version