द्रोणागिरी डोंगर खचला; घरांचीही पडझड

| उरण | वार्ताहर |
अतिवृष्टीच्या पावसाचा तडाखा उरण तालुक्याला जोरदार बसला आहे. या पावसात द्रोणागिरी डोंगराचा भाग मोठ्या प्रमाणात खचू लागला असल्याने या परिसरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा निर्णय उरण तहसील कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. त्यात उरण शहरात व ग्रामीण भागात घरांची पडझड झाली आहे. या नैसर्गिक संकटात जीवितहानी झाली नसली तरी संकटग्रस्त रहिवाशांवर भरपावसात बेघर होण्याची वेळ आली आहे. रात्री-अपरात्री होणाऱ्या घरांच्या पडझडीमुळे आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रायगड जिल्हाधिकारी कार्यालय,उप विभागीय कार्यालय पनवेल आणि तहसील कार्यालय उरण यांनी उरण तालुक्यातील द्रोणागिरी डोंगरातील माती उत्खननासाठी परवानगी दिल्याने त्याचा फटका हा सध्या अतिवृष्टीच्या पावसात द्रोणागिरी डोंगर खचून या परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षिततेला बसत आहे. आता तेच प्रशासकीय अधिकारी या परिसरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी सध्या पुढाकार घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यातच उरण शहर व चिरनेर, आवरे कळंबुसरे, रानसई या ग्रामीण भागात अतिवृष्टीच्या पावसात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होत असल्याने या परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version