रायगडात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी

दोनशे पदांसाठी होणार निवडणूक; 127 ग्रामपंचायतीत 30 सरपंच, 170 सदस्यपदासाठी होणार लढत

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदाच्या 200 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतींमधील या जागांसाठी 28 एप्रिलला मतदान होणार असल्याची जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिलचा महिना ग्रामपंचायत निवडणुकीत जाणार आहे. या कालावधीत राजकीय वातावरण तापणार आहे.

रायगड जिल्ह्यातील उरण तालुका वगळता अन्य 14 तालुक्यांतील ग्रामपचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. अलिबाग तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींमधील 10 सदस्य व 1 थेट सरपंच अशा 11 जागांसाठी लढत होणार आहे. मुरुडमधील 6 ग्रामपंचायतींमधील 15 सदस्यपदांसाठी लढत होणार आहे. पनवेलमधील 2 ग्रामपंचायतींमधील 2 सदस्यपदासाठी निवडणूक होणार आहे. कर्जतमधील 4 ग्रामपंचायतींच्या 6 सदस्य, खालापूरमधील 5 ग्रामपंचायतींच्या 6 सदस्य व 1 सरपंच अशा 7 जागा. रोहामधील 2 ग्रामपंचायतींच्या 5 सदस्य. माणगावमधील 16 ग्रामपंचायतींच्या 15 सदस्य व 2 थेट सरपंच अशा एकूण 17 जागा. सुधागड (पाली) मधील 6 ग्रामपंचायतींच्या 7 सदस्य व 1 थेट सरपंच अशा आठ जागा. तळामधील सहा ग्रामपंचायतींच्या 14 सदस्य. महाडमधील 31 ग्रामपंचायतींच्या 33 सदस्य व 13 थेट सरपंच अशा एकूण 46 जागा. पोलादपूरमधील 17 ग्रामपंचायतींच्या 17 सदस्य, 5 सरपंच अशा एकूण 22 जागा. श्रीवर्धनमधील 8 ग्रामपंचायतींच्या 19 सदस्य आणि 3 थेट सरपंच अशा एकूण 22 जागा. म्हसळामधील 11 ग्रामपंचायतींच्या 12 सदस्य आणि 2 थेट सरपंच अशा एकूण 14 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव, कोप्रोली, रेवदंडा, वैजाली, खंडाळे, नागाव या सहा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत. त्यामध्ये 1 सरपंचपदासाठी आणि 10 सदस्यपदांसाठी मतदान होणार आहे. नवेदर नवगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी होणार आहे. तर, उर्वरित ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी निवडणूक होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

उमेदवारी अर्ज 4 ते 13 एप्रिल या कालावधीत दाखल केले जाणार आहेत. 15 एप्रिलला अर्जांवरील छाननी, 17 एप्रिलला अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 28 एप्रिलमध्ये सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. मतमोजणी दुसऱ्या दिवशी 29 एप्रिलला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version