प्रा.डॉ. विजयकुमार पोटे
चीनच्या अध्यक्षपदी शी जिनपिंग यांची तिसर्यांदा निवड झाली. ती अपेक्षित होती. माओ त्से तुंग यांच्यानंतर सर्वाधिक काळ अध्यक्ष राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला जाईल. काही वर्षांनी चीनमधल्या सत्ताधारी पक्षाच्या स्थापनेला शतक पूर्ण होत असताना जिनपिंग हे अध्यक्ष राहणार असून त्यांचा एकूण स्वभाव आणि धोरणं पाहता भारतासाठी चिंतेची बाब असणार आहे.
चीनच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे शी जिनपिंग यांची निवड झाली. ती होणारच होती. तहहयात अध्यक्ष होण्यासाठी त्यांनी गेल्या वर्षीच पक्ष संघटनेतल्या नियमांमध्ये दुरुस्ती करून घेतली होती. पक्षांतर्गत विरोधकांपैकी काहींना यमसदनी पाठवलं, काहींना तुरुंगात पाठवलं. उझबेकिस्तानला जाण्याअगोदरच त्यांनी काही विरोधकांचा काटा काढला होता. जगाला दाखवायचं एक आणि करायचं दुसरंच, अशी त्यांची वृत्ती दिसते. त्यामुळे तर ते उझबेकिस्तानवरून परतल्यानंतर नजरकैदेत असल्याचं आणि चीनमध्ये सत्तांतर होईल, अशा शक्यतेच्या बातम्या जगभर पसरवल्या. त्यानंतर अचानक ते हजर झाले. त्यांच्याअगोदर दहा वर्षं अध्यक्ष राहिलेल्यांना पक्षाच्या बैठकीत हात धरून मिटींग हॉलच्या बाहेर घालवलं. जिनपिंग यांची सलग तिसर्यांदा चीनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. नियुक्तीपूर्वी, त्यांनी ‘सीपीसी’ची बैठक घेतली. जिनपिंग यांनी आता पुन्हा एकदा चीनची सत्ता काबीज केली आहे. ‘सीपीसी’ने नवीन सात सदस्यीय स्थायी समितीमध्ये शी जिनपिंग यांच्याशी एकनिष्ठ असलेल्यांचा समावेश केला आहे. जिनपिंग यांच्या टीममध्ये एकही महिला नाही. 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच हे घडलं. या अधिवेशनात निवडलेल्या केंद्रीय समितीच्या राजकीय ब्यूरोच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी शी जिनपिंग, ली क्विआंग, झाओ लेजी, वांग हुनिंग, काई क्यूई, डिंग झ्युएक्सियांग आणि ली शी यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या सर्व पक्षांतर्गत विरोधकांना काढून टाकलं आहे. यामुळे त्यांचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. आता ते तहहयात सत्तेत राहतील.
सर्वकष सत्ता भ्रष्ट बनवते. निरंकुश सत्ता हुकूमशाही वृत्तीला जन्म देते. जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांची वृत्ती सारखीच आहे. शेजारच्या देशांचा घास घेण्याची आणि जगाला मांडलिक बनवण्याची दोघांची मानसिकता सारखीच आहे. ‘सीपीसी’च्या बैठकीत जिनपिंग यांनी पक्षांतर्गत विरोधकांना बाहेर काढलं असलं, तरी आता हेच पक्षांतर्गत विरोधक जिनपिंग यांच्याविरोधात सक्रिय होण्याची शक्यता आहे. ‘सीपीसी’ आणि ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मध्ये अनेक शक्तिशाली लोकांचा समावेश आहे. ते वेळ आल्यास जिनपिंग यांच्या विरोधातल्या बंडात हवा भरू शकतात. जिनपिंग यांच्या हुकूमशाहीवर पक्षातले अनेक नेते नाराज आहेत. पक्षाचे संस्थापक माओ त्से तुंग यांच्यानंतर तिसर्यांदा सत्तेवर येणारे जिनपिंग हे पहिले चीनी नेते आहेत. ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना काँग्रेस’चं अधिवेशन संपल्यानंतर लगेचच त्यांची सलग तिसर्यांदा अध्यक्षपदी निवड झाली. चीनमध्ये या पदावर निवडून आलेला नेता ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चा (पीएलए) कमांडरही असतो. माओ त्से तुंग यांनी चीनवर सुमारे तीन दशकं राज्य केलं होतं. माओप्रमाणे जिनपिंग यांनाही आयुष्यभर सत्तेत राहायचं आहे. तिसरी टर्म मिळाल्यानंतर त्यांची ताकद पूर्वीपेक्षा अधिक वाढल्याचं स्पष्ट झालं. आता पक्षात आणि सरकारमध्ये त्यांना विरोध करणारा कोणी नाही. माजी अध्यक्ष हू जिंताओ यांना मिटींग हॉलमधून जबरदस्तीनं बाहेर काढण्यात आलं. शी जिनपिंग यांच्या शेजारीच ते बसले होते. जिनपिंग ते मूकपणे पाहत राहिले. जिनपिंग यांनी बैठकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान ली केकियांग आणि इतर तीन उच्चपदस्थ नेत्यांनाही हटवलं. जिनपिंग यांनी त्यांच्या नव्या टीमची घोषणा केली.
आता ली कियांग हे नवे पंतप्रधान बनले आहेत. डिंग हे कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाचे संचालक राहिले आहेत. ते जिनपिंग यांच्या जवळच्या सहाय्यकांपैकी एक आहेत. डिंग यांनी परदेशात जिनपिंग यांच्यासोबत अनेक बैठकांना हजेरी लावली आहे. जिनपिंग यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झुल्यावर कितीही झोके घेतले असले, तरी तो मैत्रीचा देखावा होता. झुल्यावर झुलल्यानंतर त्यांनी डोकलाममध्ये सैन्य घुसवलं. गलवान खोर्यात आक्रमण केलं. भारताला लागून असलेल्या परिसरात युध्दाप्रसंगी कामी येऊ शकणारा जगातला सर्वाधिक उंचीवरचा विमानतळ तयार केला. पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, मालदीव आदी देशांना मंडलिक बनवून भारताच्या विरोधात उतरायला भाग पाडलं. ग्वादर, हंबनटोटा बंदरं तसंच दक्षिण चीन समुद्रातल्या बेटांचा ताबा घेऊन फिलीपिन्स, जपान, व्हिएतनाम आदी देशांच्या सीमांना धोका निर्माण केला. चीन पूर्वीपासूनच भारताचा शत्रू आहे; मात्र जिनपिंग यांच्या आगमनानंतर दोन्ही देशांमधली तणावाची स्थिती थोडी वाढली. 2020 मध्ये त्यांनी म्यानमारच्या सीमेवर गलवान खोर्यात सैन्य घुसवलं. त्यामागे भारतावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा उद्देश होताच. हे सैन्य मागे घेण्यासाठी दोन वर्षं लावली. लष्करी वाटाघाटी झाल्या असल्या आणि सैन्य माघारी घेतलं गेलं असलं, तरी अजूनही चीनविषयी अविश्वासाचं वातावरण कायम आहे. इतकंच काय, अरुणाचल प्रदेशच्या हद्दीत चीनने एक गाव वसवलं आहे. तिसर्यांदा चीनचे अध्यक्ष झाल्यानंतर जिनपिंग भारताला अडचणीत आणण्याचे प्रयत्न वाढवू शकतात.
चीन पाकिस्तानचा वापर भारताविरुद्ध करतो. आता जिनपिंग पुन्हा अध्यक्ष झाल्यानंतर पाकिस्तानलाही बळ मिळणार आहे. अलीकडेच चीनने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानी दहशतवाद्याचा बचाव करून हे सिद्ध केलं आहे. याशिवाय ‘फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स’ (एफएटीएफ) या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर पडण्यासाठी चीनने पाकिस्तानला मदत केली आहे. पाकिस्तान चीनच्या कर्जाखाली दबला आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात भारताला अस्थिर करण्यासाठी चीनच्या इशार्यावर पाकिस्तानही आपल्या बेकायदेशीर कारवाया वाढवू शकतो. शी जिनपिंग हे केवळ भारतासाठीच धोका आहेत, असं नाही. शी जिनपिंग त्यांचे निर्णय पूर्वीपेक्षा अधिक ठामपणे घेतील. तिसर्या कार्यकाळात त्यांचं संपूर्ण लक्ष अर्थव्यवस्था अधिक शक्तिशाली बनवण्याकडे असेल. त्यांची आक्रमक मुत्सद्दी खेळीही पहायला मिळेल. आगामी काळात जिनपिंग तैवानच्या ताब्याबाबत मोठं पाऊल उचलू शकतात. जिनपिंग यांना आपल्या सीमा वाढवायच्या आहेत. चीनच्या स्वातंत्र्याला आणखी 25 वर्षांनी शंभर वर्षं पूर्ण होणार आहेत. जगात आपल्यापेक्षा दुसरा कोणीही बलवान नाही, हे त्यांना दाखवून द्यायचं आहे. अगदी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेनही… जिनपिंग यांच्या कब्जा धोरणामुळे सर्व शेजारी देशांनी आपली लष्करी क्षमता वाढवण्यास सुरुवात केली आहे. चीनने गेल्या दशकात जगातलं सर्वात मोठं नौदल तयार केलं आहे. अण्वस्त्रं आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचं प्रमाणही वाढलं आहे. भारतच नाही तर चीनचे इतर शेजारी देशही यामुळं हैराण झाले आहेत.
एव्हाना चीनशी दोन हात करायची गरज निर्माण झाल्यास तयार असावं यासाठी ऑस्ट्रेलिया, जपान, तैवान, व्हिएतनाम, फिलिपाइन्स या देशांनीही आपली लष्करी ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही वर्षांमध्ये याला आणखी वेग येऊ शकतो. सध्या दक्षिण कोरिया ब्लू-वॉटर नेव्ही विकसित करत आहे. ऑस्ट्रेलिया अणुऊर्जेवर चालणार्या पाणबुड्या विकत घेत आहे. भारत नवीन क्षेपणास्त्रं, हवाई संरक्षण, पाणबुड्या, हलक्या रणगाड्यांसारखी शस्त्रं खरेदी करत आहे. ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ च्या अहवालात म्हटलं आहे की चीनचं लष्करी बजेट 27 वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. आज चीनकडे दोन सक्रिय विमानवाहू युद्धनौका, लांब आणि मध्यम पल्ल्याची शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं, हजारो युद्ध विमानं आणि अमेरिकेला मागं टाकणारं नौदल आहे. एवढंच नाही तर, चीनचा अण्वस्त्र साठाही झपाट्याने वाढत आहे. चीनने जमीन, समुद्र आणि हवेतून आण्विक क्षेपणास्त्रं डागण्याची क्षमता प्राप्त केली आहे. चीनकडे सुमारे 350 अण्वस्त्रं आहेत. चीनच्या अण्वस्त्रांचा साठा 2027 पर्यंत सातशेपर्यंत पोहोचू शकतो. पेंटागॉनच्या अहवालात म्हटलं आहे की, चीन हा एकमेव देश आहे, जो स्वत:ला पोषक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी अमेरिकेच्या आर्थिक, मुत्सद्दी, लष्करी आणि तांत्रिक सामर्थ्याला सतत आव्हान देऊ शकतो. देशाचे सर्वोच्च नेते म्हणून शी जिनपिंग यांच्यासमोर अनेक मोठी आव्हानं आहेत. अमेरिकेशी भांडण करून जिनपिंग यांनी चीनमध्ये राष्ट्रवादाची भावना भडकावली; पण ढासळत्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यात त्यांना अपयश आलं. रशिया-युक्रेन युद्ध, भारत, तैवान, युरोपीयन संघ, ऑस्ट्रेलिया यांच्याशी झालेल्या भांडणामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. आता तो देश हे नुकसान कसं भरुन काढतो आणि नव्या कुलंगड्या करतो, हे पहायचं.