अंतिम यादीत समाविष्ठ 3076 मतदार करणार मतदान
। पनवेल । दीपक घरत
पालिकेच्या निवडणुका कधी होतील, नवे नगरसेवक कधी निवडून येतील, असा प्रश्न असताना पालिका क्षेत्रात लवकरच आगळ्या वेगळ्या निवडणूका पार पार पडण्याची शक्यता आहे. फेरीवाल्यांची समिती गठीत करण्यासाठी या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. पालिके तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या 3076 फेरीवाल्यांमधून ही निवड करण्यात येणार असून निवडणूक अधिकारी आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी पात्र फेरीवाल्यांची यादी कामगार उपायुक्तांकडे पाठवण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार पालिका हद्दीतील फेरीवाल्यांसाठी फेरीवाला समिती गठीत करणे आवश्यक आहे. पनवेल पालिकेतर्फे तीन वर्षापूर्वी फेरीवाला समिती गठीत करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या जाहीर धोरणानुसार गठीत करण्यात आलेल्या या 20 सदस्य असलेल्या समितीत फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींचे अर्ज मागवून 8 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर चार सदस्य हे सामाजिक संस्थांचे (एनजीओ) प्रतिनिधी होते. तसेच उर्वरित महापालिका, पोलीस अधिकारी या समितीचे सदस्य आहेत.
या समितीने केलेल्या सूचनेनुसार पालिका हद्दीत फेरीवाल्यांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 3076 फेरीवाले पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांमधून निवडणुकीच्या माध्यमातून 8 नवे सदस्य फेरीवाला समितीत घेण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार यापूर्वी अशी पहिली निवडणूक नागपूर महापालिके तर्फे घेण्यात आली आहे. त्यानंतर 4 डिसेंबर रोजी पुणे महापालिकेत फेरीवाला समितीसाठी निवडणूक होणार असल्याने, फेरीवाला समितीसाठी होणार असलेली ही निवडणूक पनवेल पालिकेच्या निवडणुकीपूर्वी पार पडते का, हा विषय औत्सुक्याचा ठरणार आहे.
हरकती नोंदवणार्यांचे समाधान
सर्वेक्षणानंतर पात्र फेरीवाल्यांच्या जाहीर करण्यात आलेल्या यादीवर हरकती आणि सूचना नोंदवण्याचे आवाहन पालिके तर्फे करण्यात आले होते. पालिकेच्या आवाहनानंतर पालिकेकडे 24 हरकती आणि सूचना नोंदवल्या गेल्या होत्या. हरकती नोंदवणार्यांचे समाधान करण्यात आले असल्याची माहिती पालिका अधिकारी नवनाथ थोरात यांनी दिली आहे.
पालिकेकडून पाठवण्यात आलेली पात्र फेरीवाल्यांची यादी कामगार उपायुक्तालयाकडे प्राप्त झाली आहे. पुढील निर्णयासाठी ही यादी आयुक्तालय कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे.
प्रदीप पवार
कामगार उपायुक्त